पुणे-सोलापूर महामार्गावरील एसटीच्या हॉटेल थांब्यांची चौकशी | पुढारी

पुणे-सोलापूर महामार्गावरील एसटीच्या हॉटेल थांब्यांची चौकशी

रावणगाव; पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील एस. टी. बसथांब्यावरील हॉटेलची पथकाद्वारे चौकशी करणार असल्याची माहिती एस. टी. परिवहन महामंडळाचे मुंबई सेंट्रलचे महाव्यवस्थापक शेखर चन्ने यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली.
सोलापूर महामार्गावरील एसटी प्रवाशांची हॉटेलचालकांकडून अधिकृत लूट या नावाने दैनिक पुढारीत विशेष वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर वरील प्रतिक्रिया त्यांनी दिली.

गेल्या अनेक वर्षांपासून महामार्गावर दौंड व इंदापूर तालुक्यांमध्ये तीनच हॉटेलचालकांना एसटी महामंडळाचे थांबे आहेत. मोजकेच हॉटेलचालक नूतनीकरणाच्या नावाखाली बसथांबे कायमस्वरूपी करून घेतात. एसटी महामंडळाच्या बसची या महामार्गावर संख्या जास्त असल्याने या ठिकाणच्या हॉटेलवर अपुर्‍या सुविधा मिळत आहेत. अन्नपदार्थांबाबतीतही अनेक तक्रारी प्रवाशांनी संबंधित पुणे विभागीय नियंत्रकाकडे केल्या आहेत. मात्र, तरीही या हॉटेलचालकांवर कारवाई होत नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी संबंधित हॉटेलचालकांना पाठीशी घालतात का? असा प्रश्न प्रवासी करीत आहेत.

प्रवाशांना ताटकळत बसवून ठेवण्याचा प्रकार
दैनिक पुढारीतील वृत्तानंतर महाव्यवस्थापकाने याप्रकरणी पथकाद्वारे चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. विभागीय नियंत्रकांनी हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करण्याऐवजी फक्त समज देण्याचे काम केल्याने संबंधित हॉटेलचालकांचे चांगलेच फावत आहे. प्रवाशांना तासन् तास या हॉटेलवर ताटकळत बसावे लागून आपला वेळ वाया घालवावा लागत आहे.

विभागीय नियंत्रकांकडून जुजबी उत्तरे
पुणे विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हॉटेलचालकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करताना आम्ही फक्त समज देऊ आणि शंभर रुपये ते पाचशे रुपयांपर्यंत दंड करू शकतो, असे सांगत पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला.

Back to top button