नगर : सभा तहकूब; आरोप-प्रत्यारोप ; आठ संचालक उशिरा आल्याने पदाधिकारी निवड लांबणीवर | पुढारी

नगर : सभा तहकूब; आरोप-प्रत्यारोप ; आठ संचालक उशिरा आल्याने पदाधिकारी निवड लांबणीवर

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा :  श्री छत्रपती शिवाजी महाराज खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी गुरुवारी सकाळी अकरा वाजता आयोजित केलेल्या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ सदस्य उशिरा आले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी अभिमान थोरात यांनी कोरमअभावी सभा तहकूब केली. त्यावर दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. खरेदी-विक्री संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ, पाचपुते गटाचे तीन, तर नागवडे गटाचे दोन सदस्य आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष ठरविण्यासाठी माजी आमदार राहुल जगताप यांच्या निवासस्थानी जगताप, अण्णासाहेब शेलार, घनश्याम शेलार, बाळासाहेब नाहाटा, दीपक भोसले यांच्यात बैठक झाली.

अध्यक्ष पदाबाबत निर्णय झाला. मात्र, उपाध्यक्ष पदाबाबत नेत्यांमध्ये लवकर एकमत झाले नाही. परिणामी संचालकांना सभास्थानी जाण्यास उशीर झाला. याच संधीचा फायदा उचलत पाचपुते व नागवडे गटांचे सदस्यांनी एकत्र आले. तेरापैकी आठ सदस्य वेळेवर आले नाहीत. त्यामुळे त्यांनी कोरमअभावी सभा तहकूब करण्याची मागणी केली. त्यानंतर काही मिनिटात राष्ट्रवादीचे सर्व सदस्य हजर झाले. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी थोरात यांनी कोरम अभावी सभा तहकूब केली.

त्यावर दीपक भोसले यांनी सभास्थानी आक्रमक भूमिका घेत निवडणूक घेण्याची मागणी केली. मात्र, निवडणूक अधिकारी थोरात यांनी त्यास दाद दिली नाही. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी आयोजित केलेल्या सभेस सदस्य वेळेवर हजर न झाल्याने, ही निवडणूक पुन्हा होणार आहे. पुढील आठ दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

दबावाला बळी पडून निर्णय
अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काही मंडळींनी जाणीवपूर्वक खोडा घातल्याने ही निवड होऊ शकली नाही. कुणाच्या तरी दबावाला बळी पडून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे, असा आरोप दीपक भोसले यांनी केला.

भोसले यांच्यावर कारवाई करा
आजच्या निवड प्रक्रियेत आठ संचालक वेळेत हजर न राहिल्याने सभा तहकूब करण्यात आली. दीपक भोसले यांनी अधिकार्‍यांना केलेली दमबाजी गैर असून, त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे टिळक भोस म्हणाले यांनी केली.

वेळेत न आल्याने सभा तहकूब
निवडणूक अधिकारी अभिमान थोरात म्हणाले, आठ संचालक वेळेत न आल्याने ही सभा तहकूब करण्यात आली. सभा ठिकाणी नोटीस का लावण्यात आली नाही, असे विचारता सभा ठिकाणी नोटीस लावणे बंधनकारक नाही.

पोलिस बंदोबस्ताची मागणी का नाही?
खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीबाबत श्रीगोंदा पोलिसांना कळविण्यात आले नव्हते. किंबहुना निवडीसाठी पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला नव्हता. सभा ठिकाणी आदेश नागवडे व दीपक भोसले यांच्यात शाब्दिक वादावादी झाल्यानंतर पोलिस सभास्थळी आले.

त्यावेळी नियम नव्हता का?
खरेदी-विक्री संघाच्या पदाधिकारी निवडीत आठ संचालक उशिरा आल्याने निवडणूक अधिकार्‍यांनी नियमावर बोट ठेवत ही निवड तहकूब केली. याच संस्थेच्या अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्यात आले. त्यावेळी वेळेचा नियम नव्हता का? असा सवालही आता उपस्थित केला जात आहे.

सभेची नोटीस बेकायदा?
संचालकांना सभेबाबत जे पत्र देण्यात आले होते. त्यावर सभास्थळी अकरा वाजता हजर राहण्याबाबत सूचित करण्यात आले होते. त्याखेरीज त्या पत्रावर निवडणूक कार्यक्रमाबाबत कुठलीही दिशा स्पष्ट करण्यात आली नव्हती. त्यामुळे निवडणूक अधिकार्‍यांनी दिलेले पत्र कायदेशीर बाबींचा उल्लंघन करणारे आहे. सभेबाबतचे पत्र वादाच्या भोवर्‍यात सापडण्याची शक्यता आहे.

Back to top button