बारामती तालुक्यात ज्वारीची काढणी सुरू; यंदा कडब्याला मागणी वाढणार | पुढारी

बारामती तालुक्यात ज्वारीची काढणी सुरू; यंदा कडब्याला मागणी वाढणार

उंडवडी; पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील जिरायती भागातील उंडवडी सुपेसह आजूबाजूच्या परिसरात रब्बी हंगामातील ज्वारीच्या पिकांची काढणी सुरू झाली आहे. त्यात उन्हाळा सुरू झाला असून, दिवसेंदिवस ऊन वाढत असल्याने शेतकरी सकाळ व संध्याकाळी ज्वारीची काढणी करताना दिसत आहे. चालू वर्षी पाऊस चांगला झाल्याने रब्बी हंगामातील पिके जोमदार आहेत. त्यात सध्या ज्वारीच्या पिकाऐवजी शेतकरी गहू करण्यावर भर देत असून, गव्हाचे पीक काढण्यासाठी हार्वेस्टर मशीनचा वापर होत आहे.

यामुळे कमी वेळात पिके काढून होत आहे. त्यात ज्वारीचे पीक काढण्यास मजूर मिळत नसून, काढणीसही त्रास होत असल्याने दिवसेंदिवस ग्रामीण भागातील शेतकरी ज्वारीच्या पीक करण्यास टाळाटाळ करत असल्याने आपोआपच ज्वारीच्या पिकांचे उत्पन्न कमी होत आहे. त्यामुळे ज्वारीचा कडबाही कमी होत असून, या कडब्याच्या किंमती वाढल्या आहेत. तसेच ज्वारीचे बाजारभावही वाढले आहेत. असे असले तरी ज्या शेतकऱ्यांनी ज्वारी पीक केले आहे, त्यांनी काढणी सुरू केली असून, कडबा काढणेदेखील सुरू आहे.

दिवसेंदिवस ग्रामीण भागातील शेतकरी मजुरांच्या कमतरतेमुळे ज्वारीच्या पेरण्या करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे ज्वारीचा कडबादेखील कमी झाला असून, सुका चारा म्हणून कडब्याला मागणी जास्त आहे. यंदा 1 हजार 600 ते 1 हजार 800 रुपये शेकडा बाजार झाला असला, तरी कडबा मिळणे कठीण झाले आहे.

                                                -राजू गवळी, स्थानिक शेतकरी.

 

Back to top button