भंडारा : इंग्रजीचा पेपर पाहताच विद्यार्थीनीला आली भोवळ | पुढारी

भंडारा : इंग्रजीचा पेपर पाहताच विद्यार्थीनीला आली भोवळ

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : आजपासून सुरू झालेल्या इयत्ता १२ वी बोर्डाच्या परिक्षेचा इंग्रजीचा पहिलाच पेपर पाहून विद्यार्थिनीला भोवळ आली आहे. ही घटना शहरातील ज. मु. पटेल महाविद्यालयातील परिक्षा केंद्रावर घडली. या घटनेने काही काळ परिक्षा केंद्रात खळबळ माजली होती. इंग्रजीचा पेपर संपल्यानंतरही ती शुद्धीवर न आल्याने परिक्षेपासून मुकावे लागले आहे.

इयत्ता १२ वीच्या बोर्डाची परिक्षा आज मंगळवार (दि. २१) रोजीपासून सुरू झालेली आहे. आज इंग्रजी विषयाचा पहिला पेपर होता. दरम्यान शहरातील एका खासगी शाळेच्या विद्यार्थीनीचा ज. मु. पटेल महाविद्यालयातील परिक्षा केंद्रावर बैठक क्रमांक होता. या परिक्षा केंद्रावर आज मंगळवारी सकाळी ११ वाजता विद्यार्थिनीच्या हातात इंग्रजी विषयाचा पहिला पेपर हातात आला. यानंतर १५ ते २० मिनिटानंतर अचानक तिला भोवळ आली.

यानंतर विद्यार्थिनीला तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यादरम्यान परिक्षा केंद्रावरील अन्य विद्यार्थ्यांचे मात्र, लक्ष विचलीत झाले. दरम्यान पेपर संपेपर्यंत ही विद्यार्थीनी शुद्धीवर आलेली नव्हती. त्यामुळे इंग्रजीच्या पेपरपासून तिला वंचित राहावे लागले.

हेही वाचा : 

Back to top button