पुणे : दोन्ही बाजूंनी उडणार प्रचाराचा धुरळा; नेत्यांच्या सभांसह रोड शोचे आयोजन | पुढारी

पुणे : दोन्ही बाजूंनी उडणार प्रचाराचा धुरळा; नेत्यांच्या सभांसह रोड शोचे आयोजन

हिरा सरवदे

पुणे : भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या अकाली निधनामुळे होणारी कसबा विधानसभा पोटनिवडणूक अटीतटीची झाली आहे. महाविकास आघाडी आणि भाजप युतीकडून दिग्गज नेत्यांच्या सभा आणि रोड शोचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात कसब्यामध्ये प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाडीच्या वतीने कसब्यातून काँग्रेसचे माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर निवडणूक रिंगणात आहेत. धंगेकर यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसली असून, पहिल्या टप्प्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बैठका आणि सभा घेऊन महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मतदारसंघात दररोज सकाळी व सायंकाळी पदयात्रा, कोपरा सभा घेतल्या जात आहेत.

पुढील आठवड्यातही प्रचाराचा जोर कायम ठेवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभा आणि रोड शोचे नियोजन करण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा रोड शो 20 फेब्रुवारीला होणार आहे. त्याच दिवशी काँग्रेसचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचाही रोड शो आणि सभा होणार आहे. त्यानंतर 23 फेब्रुवारीला शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभा, 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या जाहीर सभा होणार आहेत. याशिवाय शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आणि काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांच्याही सभा होणार आहेत. तत्पूर्वी, शुक्रवारी (दि. 17) माजी मंत्री अमित देशमुख यांच्या सभेचे नियोजन करण्यात आल्याचे माजी आमदार व प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले.

भाजपने पोटनिवडणुकीच्या रिंगणात महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यानंतर इतर इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांची नाराजी दूर करण्यात भाजप नेत्यांना यश आले आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुसर्‍या दिवसापासून पदयात्रा, दुचाकी रॅली व भेटीगाठींवर रासने यांनी जोर दिला. तर, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सर्वांनी एकत्रित काम करण्याच्या सूचना दिल्या. त्याशिवाय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही भेटीगाठी व मेळावे घेऊन पारंपरिक मतदारसंघ राखण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.

आतापर्यंत ग्राउंडवर सूक्ष्म नियोजन करण्यासोबतच तीन बूथचे एक शक्तिकेंद्र केले असून, त्याची जबाबदारी एका नगरसेवकावर, तर प्रत्येक प्रभागाची जबाबदारी एका आमदारावर सोपविली आहे. त्यानंतर आता भाजपने पुढील आठवड्यात युतीच्या नेत्यांच्या सभांचे नियोजन केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, मंगलप्रसाद लोढा, गिरीश महाजन, शिवेंंद्रराजे भोसले, उदयनराजे भोसले यांच्या सभांचे नियोजन केले आहे.

Back to top button