कसबा पेठ पोटनिवडणूक : भाजपच्या प्रचारासाठी नेत्यांची फौज | पुढारी

कसबा पेठ पोटनिवडणूक : भाजपच्या प्रचारासाठी नेत्यांची फौज

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अन्य काही नेते भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी येणार असल्याचे भाजपतर्फे सोमवारी सांगण्यात आले. कसबा पेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसंदर्भात भाजपच्या आगामी प्रचारासंदर्भात पत्रकार परिषदेत आमदार माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली.

मिसाळ म्हणाल्या की, हिंदुत्व आणि काँग्रेस यांच्यात ही लढाई होत आहे. रासने यांनी निम्म्या मतदारसंघाचा दौरा पूर्ण केला आहे. दुचाकी रॅलीमध्ये तरुण उत्साहाने सहभागी झाले होते. तीन बूथचे एक शक्तिकेंद्र केले असून, त्याची जबाबदारी एका नगरसेवकावर, तर प्रत्येक प्रभागाची जबाबदारी एका आमदारावर सोपविली आहे.

मोहोळ म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पूर्वनियोजित दौरा आहे. ते पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी येत नाहीत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच गडकरी यांच्या जाहीर सभा होणार आहेत. बावनकुळे यांचा दोन टप्प्यांत दौरा होणार असून, ते विविध समाजघटकांचे मेळावे घेणार आहेत. पंकजा मुंडे, मंगलप्रसाद लोढा, गिरीश महाजन, शिवेंंद्रराजे भोसले, उदयनराजे भोसले हेही प्रचाराला येणार आहेत.
रासने एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, येथील जुन्या वाड्यांसंदर्भात टीपी स्कीम राबविण्यासंदर्भात मी आराखडा करीत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी मी चर्चा केली आहे.

Back to top button