नगर : मजूर फेडरेशनवर सत्ताधार्‍यांचाच गुलाल! | पुढारी

नगर : मजूर फेडरेशनवर सत्ताधार्‍यांचाच गुलाल!

नगर : पुढारी वृत्तसेवा :  राज्याचे लक्ष लागलेल्या जिल्हा मजूर फेडरेशनसाठी सुरुवातीलाच सत्ताधार्‍यांनी दोन जागा बिनविरोध खिशात घातल्यानंतर उवर्रीत 18 जागांसाठी काल चुरशीचे मतदान झाले. त्यानंतरच्या मतमोजणीत सत्ताधारी आणि विरोधी गटाने प्रत्येकी 9-9 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे एकूण 11 जागा झालेल्या बोरुडे गटाच्या बाजुला सत्तेचे पारडे काठावर जरी झुकले असले, तरी विरोधी गायकवाड गटानेही काल विजयानंतर जल्लोष केल्याने ‘जर-तर’ची समिकरणे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. मजूर फेडरेशनच्या 20 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होती.

यामध्ये अर्ज माघारीवेळी नगर शहर आणि कर्जत मतदार संघातून सत्ताधारी अर्जुनराव बोरुडे यांनी या दोन जागा बिनविरोध मिळविल्या होत्या. त्यानंतर उवर्रीत 18 जागांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी रत्नाळे यांच्या मार्गदर्शनात निवडणूक प्रक्रिया पार पडली. यंदा प्रथमच स्थानिक आमदारांनी या निवडणुकीत लक्ष केंद्रीत केल्याने रंगत निर्माण झाली होती. यामध्ये गुप्त बैठकांनीही जोर धरला होता. त्यामुळे निवडणुकीचा निकाल हा एकतर्फी लागणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत होते. त्यामुळे सर्वांच्याच नजरा या निकालाकडे खिळल्या होत्या.
काल सकाळी 8 वाजेपासून आनंद विद्यालयात मतदान पार पडले.

सत्ताधारी गटाचे अर्जुनराव बोरुडे हे मतदान केंद्रावर उभे होते. तर ज्येष्ठ नेते सबाजीराव गायकवाड हे देखील तळ ठोकून होते. एकूण 668 पैकी 662 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी 4 नंतर मतमोजणीस सुरुवात झाली. मतमोजणीत सर्वात प्रथम ओबीसी मतदार संघातून गायकवाड गटाचे प्रकाश बोरुडे हे विजयी होताच मतमोजणीतील चुरस दिसू लागली. त्यानंतरही अकोलेत दोन मतांनी गायकवाड गटाचे गजे हे निवडून आले, संगमनेरात सत्ताधारी बोरुडे गटाचे कानवडे हे पाच मतांनी विजयी झाले. अशाप्रकारे हे निकाल लागत असल्याने श्रेष्ठींसह उमेदवारांचीही धाकधूक वाढली होती.

राहुरीतून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे व्याही व तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे यांच्या निकालाचीही उत्कंठा लागली होती. त्यांनी 28 मतदांनी तनपुरेंवर मात केली. या सर्व 18 पैकी बोरुडे आणि गायकवाड गटाला प्रत्येकी 9 जागा मिळाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बोरुडे गटाकडे बिनविरोध दोन जागांसह आता एकूण 11 जागा झाल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तर या अटीतटीच्या निवडणुकीतही 9 जागांवर मतदारांनी कौल दिल्याने गायकवाड गटातील काही कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.

बोरुडे 36; गायकवाड 150 मतांनी विजयी
सत्ताधारी मंडळाचे नेते अर्जुनराव बोरुडे यांनी 346 मते घेत अशोक सोनवणे यांचा 36 मतांनी पराभव केला. तर विरोधी मंडळाने नेते प्रशांत गायकवाड यांनी 410 मते घेत विरोधी ठुबे यांचा तब्बल 150 मतांनी पराभव केल्याचे पहायला मिळाले.

दोन्ही मंडळाचे विजयी उमेदवार
अर्जुन बोरूडे (346, बोरुडे गट ), प्रशांत गायकवाड (410 गायकवाड गट ), अनिल पाचपुते (336, बोरुडे गट) रामचंद्र राळेभात (334, गायकवाड गट), तान्हाजी गायकवाड (345, गायकवाड गट), बाळासाहेब सोनवणे (349, गायकवाड गट) नामदेवराव ढोकणे (344, बोरुडे गट), शंकर गायकवाड (339, बोरुडे गट ), उत्तमराव घोगरे (343, बोरुडे गट), विजय गायकवाड (335, बोरुडे गट ), नानासाहेब कानवडे (332, बोरुडे गट), सुशांत गजे (330, गायकवाड गट), प्रकाश सदाफुले (340, गायकवाड गट), प्रकाश बोरूडे (321, गायकवाड गट) किशोर गायकवाड (335, बोरुडे गट), रुख्मीणी कराळे (318, गायकवाड गट), विद्या काळे (331, गायकवाड गट).

मतदानासाठी ‘मजूर’ चारचाकीत..!
‘मजूर’ संस्थेसाठी झालेल्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी प्रत्येक मतदार हा चारचाकी वाहनात येत होता. दोन्ही हातांच्या बोटांतील सोन्याच्या अंगठ्या, गळ्यातील लॉकीट आणि हातात दोन-दोन मोबाईल घेऊन एन्ट्री करणारा मतदार पाहून ही संस्था आता नावालाच ‘मजूर’ राहिल्याची चर्चा मतदान केंद्राबाहेर सुरू होती.

सत्ताधार्‍यांपेक्षा विरोधकांना मते जास्त!
एकूण वैध मतांच्या आकडेवारीचे अवलोकन करताच सत्ताधारी बोरुडे गटाच्या 18 उमेदवारांना 5811 मते पडली आहेत. तर विरोधी गायकवाड गटाच्या 18 उमेदवारांच्या एकूण मतांची संख्या ही 5954 इतकी असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे या आकडेवारीतून ही निवडणूक आणि मतदान किती चुरशीचे झाले, हेच पहायला मिळते.

..तर, सत्तेची समिकरणे बदलणार?
फेडरेशनच्या सत्तेसाठी 11 जागांची मॅजिक फिगर आवश्यक आहे. ती सध्या सत्ताधारी बोरुडे गटाकडे आहे. मात्र, याउलट विरोधी गटाकडेही 9 जागा आहेत. त्यामुळे ‘चेअरमन’ पदाच्या स्पर्धेतून कदाचित, ‘जर-तर’ची गणिते जुळलीच, तर धक्कादायक घडामोडी पहायला मिळू शकतात. यातून ‘त्या’ तालुक्याला प्रथमच ‘चेअरमन’ पदाची लॉटरी लागू शकते, असाही अंदाज वर्तविला जात आहे.

 

Back to top button