पुणे : कुत्र्यांच्या नसबंदीसाठी केवळ दोनच संस्था | पुढारी

पुणे : कुत्र्यांच्या नसबंदीसाठी केवळ दोनच संस्था

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कुत्र्यांच्या नसबंदीसाठी सध्या दोन संस्था कार्यरत आहेत. पाच झोन आणि समाविष्ट गावांची व्याप्ती पाहता आणखी दोन-तीन संस्थांची आवश्यकता आहे. सहा महिन्यांपूर्वी निविदा प्रक्रिया राबवून दोन संस्थांची निवड करण्यात आली. मात्र, तांत्रिक बाबींमुळे संबंधित संस्थांचे कामच सुरू झालेले नाही. परिणामी, कुत्र्यांच्या नसबंदीसाठी मनुष्यबळ अपुरे पडत आहे.
वडगाव शेरीमध्ये लहान मुलाला कुत्र्याने चावा घेतल्याने गंभीर दुखापत झाली. परिसरातील नागरिकांनी रोष व्यक्त केला आणि महापालिकेच्या नसबंदीच्या कामावर ताशेरे ओढले.

सनसिटी परिसरात जवळपास 90 मोकाट कुत्री असून, त्यापैकी 40 कुत्री गुरुवारपर्यंत महापालिकेने ताब्यात घेतली. नसबंदी झालेल्या कुत्र्यांच्या लसीकरणाचे आणि नसबंदी न झालेल्या कुत्र्यांच्या नसबंदीचे काम सुरू करण्यात आले आहे. परिसरातील सर्व कुत्र्यांना आठ-दहा दिवस निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. सध्या महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे युनिव्हर्सल आणि कॅनाईन केअर कंट्रोल या दोन संस्थांतर्फे शहरातील सहा पाँडमध्ये नसबंदी केली जाते. प्रत्येक झोनअंतर्गत एका संस्थेने जबाबदारी घेतल्यास मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण आणण्याचे काम वेगाने होऊ शकते. निविदा काढून दोन संस्थांची नियुक्ती करण्यात आली असली तरी एका संस्थेला जागा मिळत नसल्याने आणि एका संस्थेने कागदपत्रांची पूर्तता न केल्याने नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

आरोग्य विभागातर्फे पाच झोनमध्ये कुत्री पकडण्यासाठी पाच गाड्या आणि संस्थांच्या सहा गाड्या आहेत. सध्या नसबंदीसाठी दोन संस्था कार्यरत असून आणखी दोन संस्थांची नियुक्ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दर वर्षी 12 ते 15 हजार कुत्र्यांची नसबंदी केली जात आहे.
                    – डॉ. सारिका फुंडे, पशुवैद्यकीय अधिकारी, पुणे महापालिका

Back to top button