मंचर : दुचाकीवरील दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला | पुढारी

मंचर : दुचाकीवरील दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला

मंचर(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : मंचर येथून कामावरून सुटल्यानंतर दुचाकीने घरी चाललेल्या पती-पत्नीवर चांडोली खुर्द येथे बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्याची दुचाकीला धडक बसल्याने पती-पत्नी दुचाकीसह रस्त्यावर पडल्याने ते दोघेही जखमी झाले. या दांपत्यावर मंचर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत माहिती अशी की थोरांदळे (ता. आंबेगाव) येथील पोपट वाबळे (वय 30) व त्यांची पत्नी नमिता पोपट वाबळे (वय 26) हे मंचर येथे नोकरी करतात. मंगळवारी (दि. 7) कामावरून सुटल्यानंतर घरी जात असताना चांडोली खुर्द येथे सायंकाळी 7 च्या सुमारास बिबट्याने अचानक त्यांच्यावर झडप मारली. अचानक झालेल्या हल्यात ते दुचाकीसह रस्त्यावर पडले. गाडीचा झालेल्या मोठा आवाजामुळे बिबट्या पळून गेला. यात रस्त्यावर पडल्याने नमिता वाबळे यांच्या डोक्याला जखम झाली, तर पोपट वाबळे यांच्या पायाला, हाताला जखमा झाल्या आहेत.

दरम्यान, ही घटना घडताच गणेश अभंग व काही स्थानिक नागरिकांनी त्यांना मंचर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती कळताच वन अधिकार्‍यांनी मंचर येथील रुग्णालयात वाबळे पती-पत्नीची भेट घेऊन विचारपूस केली व हवी ती मदत देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, या रस्त्यावर या अगोदरही अनेकदा दुचाकीचालकांवर बिबट्याने हल्ले केल्याचे घटना घडली असून, पुन्हा घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Back to top button