मार्चमध्ये डाळी कडाडणार! किरकोळ बाजारात डाळी १२० ते १४० रुपये किलो; एपीएमसीत डाळींचे दर स्थिर | पुढारी

मार्चमध्ये डाळी कडाडणार! किरकोळ बाजारात डाळी १२० ते १४० रुपये किलो; एपीएमसीत डाळींचे दर स्थिर

पुढारी वृत्तसेवा, नवी मुंबई : राजेंद्र पाटील : गेल्या ऑक्टोबर महिन्यात एपीएमसीत रवा, मैदा, पोह्यांसह घाऊक डाळींच्या दरात वाढ झाली होती. त्यानंतर किरकोळ बाजारात ४० डाळी महागल्या होत्या. मात्र गेल्या दहा दिवसात एपीएमसीत डाळींचे दर स्थिर असतानाही किरकोळ बाजारात १२० ते १४० रुपये किलो डाळींचे दर पोहचले आहेत. सर्वच डाळी या २२ ते ६० रुपये किलोमागे किरकोळ बाजारात महागल्या आहेत. एपीएमसीत मार्चमध्ये आणखी नवीन डाळींचा पुरवठा सुरु झाल्यानंतर दरवाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती घाऊक व्यापारी निलेश विरा यांनी दिली.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेलसह रायगड जिल्ह्यात रोज किमान ९० ते ११० गाडी डाळींचा पुरवठा एपीएमसी बाजारातून होतो. एपीएमसीतील घाऊक दाणा बाजारामध्ये डाळींची आवक काही प्रमाणात घटली आहे. यामुळे किरकोळ बाजारात मात्र डाळींचे दरात थेट ४० ते ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात केवळ मूग, मूगडाळ तीन रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात मात्र तूर, मूग, चणा, मसूर, उडीद, मटकी, चवळी, राजमा यांचे दर घाऊकपेक्षा किरकोळ बाजारात थेट दुपटीने वाढले आहेत. एपीएमसीत गेल्या दहा दिवसात डाळींच्यादरात कुठलीही दरवाढ झाली नसून दर स्थिर आहेत.

गेल्या वर्षी चार ते सहा महिन्यांत चार ते पाचवेळा डाळीच्या दरात चढउतार झाली, जीएसटी, इंधन, भाडेवाढ यामुळे किरकोळ बाजारात डाळींच्या दरासह जीवनाश्यक वस्तूंची दरवाढ झाल्याचे किरकोळ व्यापारी सांगतात. राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातून दरवर्षी होणा-या डाळींच्या उत्पादनात यावर्षी काही प्रमाणात घट झाली आहे. तर काही डाळींचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामध्ये चण्याचे उत्पादन अधिक तर डाळी उत्पादन करणाऱ्या काही राज्यांत शेकडो क्विंटल डाळी खराब झाल्या आहेत. त्याचा फटका डाळ खरेदी करणाऱ्या मिलला बसतो.

 

आदित्य ठाकरे : गद्दार गँगचे सरकार पडणारच

“बाळासाहेब आमच्यासोबत बोलतच नाहीत” थोरात यांच्या राजीनाम्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Back to top button