आदित्य ठाकरे : गद्दार गँगचे सरकार पडणारच | पुढारी

आदित्य ठाकरे : गद्दार गँगचे सरकार पडणारच

नाशिक (इगतपुरी)  : पुढारी वृत्तसेवा
गद्दार गँगचे राज्य सरकार येत्या काही दिवसांत पडणार असून, जनता आमच्या पाठीशी ठाम उभी राहणार असल्याचा विश्वास युवासेनाप्रमुख, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने मुंढेगाव येथे मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी आमदार निर्मला गावित, नयना गावित, सुधाकर बडगुजर, दत्ता गायकवाड, तालुकाप्रमुख भगवान आडोळे, माजी सभापती सोमनाथ जोशी, उपसभापती विठ्ठल लंगडे आदी उपस्थित होते. गद्दारांनी खोके खर्च केले तरी लोक त्यांच्याकडे जाणार नाहीत. कारण सध्या अस्तित्वात असलेले सरकार हे महाराष्ट्राचे नव्हे तर दिल्लीचे सरकार आहे. सध्याचे मुख्यमंत्री दिल्लीला महाराष्ट्रातील जनतेसाठी नाही तर स्वतःच्या फायद्यासाठी जात असल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला. यावेळी राजाभाऊ नाठे, सरपंच मंगला गतीर, ज्येष्ठ नेते रमेश गावित, राधाकृष्ण जाधव, नंदलाल भागडे, कावजी ठाकरे, मोहन बर्‍हे, विनोद भागडे, भूषण जाधव, अशोक सुरूडे, सूर्यकांत भागडे आदी उपस्थित होते.

जिंदाल दुर्घटनेचा तारांकित प्रश्न करणार
स्थानिक युवकांनी जिंदाल पॉलीफिल्म कंपनीचा मुद्दा उपस्थित केला. कंपनीत लागलेल्या आगीत अनेक कामगारांचा मृत्यू झाला असून, हे प्रकरण राज्य सरकारने दाबले आहे. ही दुर्घटना कशामुळे झाली याची चौकशी लावावी, अशी मागणी युवकांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे केली. दरम्यान, मी पुन्हा दौर्‍यावर येणार असून, या दुर्घटनेतील सत्य बाहेर काढण्यासाठी विधानसभेत तारांकित प्रश्न करणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा:

Back to top button