कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुक : चार जणांचा ‘एनओसी’साठी अर्ज | पुढारी

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुक : चार जणांचा ‘एनओसी’साठी अर्ज

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, निवडणूक लढविण्यासाठी गरज असलेल्या विविध ‘ना हरकत’ दाखल्यांसाठी (एनओसी) महापालिकेकडे आतापर्यंत चार जणांनी अर्ज केले आहेत. यामध्ये भाजपकडून तीन, तर काँग्रेसकडून एक, असे अर्ज आल्याची माहिती महापालिका अधिकार्‍याने दिली आहे. कसबा पेठ विधानसभेच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

त्यामुळे राजकीय पक्षांकडून विविध स्तरांवर तयारी केली जात आहे तसेच बैठकांचे सत्र सुरू आहे. निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांकडून पूर्वतयारी केली जात आहे. भाजपकडून इच्छुक असलेले मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक, हेमंत रासने, धीरज घाटे आणि काँग्रेसकडून माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी थकबाकी नसल्याच्या विविध एनओसी मिळण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केले आहेत. दरम्यान, कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकांसाठी 31 जानेवारी रोजी अधिसूचना काढली जाणार आहे.

Back to top button