पुणे: कुमार समृद्धी हाउसिंग सोसायटीचे पदाधिकारी बरखास्त, उपनिबंधक कार्यालयाचा आदेश | पुढारी

पुणे: कुमार समृद्धी हाउसिंग सोसायटीचे पदाधिकारी बरखास्त, उपनिबंधक कार्यालयाचा आदेश

येरवडा (पुणे), पुढारी वृत्तसेवा: विश्रांतवाडी परिसरातील कुमार समृद्धी सहकारी गृहनिर्माण संस्थेने गेल्या अनेक वर्षांची लेखापरीक्षण दुरुस्ती अहवाल सादर केला नाही. तसेच, लेखापरीक्षणात अनेक कायदे व पोटनियमांचे पदाधिकाऱ्यांनी उल्लंघन केल्याचे सहकार विभागातील उपनिबंधकांच्या निदर्शनास आले. यामुळे संस्थेतील दहा पदाधिकाऱ्यांची कमिटी बरखास्त करून प्रशासकपदी पी. बी. सोनवणे यांची नियुक्ती केली आहे. याबाबत उपनिबंधक नारायण आघाव यांनी आदेश दिले आहेत.

या गृहनिर्माण संस्थेच्या कारभाराविरोधात देवदत्त चौधरी व इतर सदस्यांनी उपनिबंधक कार्यालयात गेल्या काळात वेळावेळी तक्रार अर्ज दिले होते. संस्थेच्या आवारातील अवैध बांधकामप्रकरणी देखील संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी डोळेझाक करून नियम, कायद्याचे उल्लंघन करून सरकारी यंत्रणांना खोटी माहिती दिली. रहिवाशांच्या हक्कांवर गदा आणली आणि बांधकाम व्यावसायिकाला मदत केली. यामध्ये लेखापरीक्षण दुरुस्ती अहवाल व अनेक तातडीचे महत्त्वाचे विषय पत्रिकेमध्ये घेतले नाहीत. तसेच, सभेचा अहवाल आजतागायत प्रसिद्ध केलेला नाही. संस्थेचे अध्यक्ष, सचिव, कोशाध्यक्ष व अन्य सर्व सभासदांनी बेकायदेशीर कामांना संमती दिल्याचे या तक्रार अर्जात नमूद केले आहे. त्यावर तीनवेळा सुनावणी घेऊन उपनिबंधक आघाव यांनी गेल्या 4 जानेवारी रोजी संस्थेची कमिटी बरखास्त करण्याचे आदेश दिले आहेत.

Back to top button