केवळ आठच प्रकल्पांना प्रक्रियायुक्त पाणी..! | पुढारी

केवळ आठच प्रकल्पांना प्रक्रियायुक्त पाणी..!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमधील पाणीसाठा कमी असल्याने महापालिकेने बांधकामांसाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणे सक्तीचे केले आहे. मात्र, शहरातील केवळ आठच मोठ्या प्रकल्पांसाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, महापालिकेने पिण्याच्या पाण्याचा वापर करणार्‍या 28 ठिकाणचे नळजोडे तोडले असून, चार प्रकल्पांना 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला व इतर तीन धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. मात्र मागील पावसाळ्यात पुरेसा पाऊस न झाल्याने धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठी नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने उपलब्ध साठा जूनअखेरपर्यंत पुरण्यासाठी पाणी वापरावर निर्बंध लावले आहेत. याचाच एक भाग म्हणून शहरातील बांधकामांसाठी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांत (एसटीपी) प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणे सक्तीचे केले आहे. त्यासाठी पालिकेने आपल्या‘एसटीपी’मधील पाणी मोफत उपलब्ध करून दिले आहे. बांधकाम व्यावसायिकांना टँकरची व्यवस्था करावी लागत आहे. महापालिकेच्या नऊ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांतून दररोज 400 ते 450 दशलक्ष लिटर पाणी प्रक्रिया करून नदीत सोडले जाते. हे पाणी बांधकामासाठी योग्य असले, तरी शहरातील बांधकाम व्यावसायिक या पाण्याचा वापर करण्यास तयार नाहीत.

अन्य ठिकाणीही पाणीवापर

काही बांधकामांना थेट पिण्याचे पाणी वापरले गेल्याचेही समोर आले. मात्र, यात फक्त मोठ्या प्रकल्पांचीच पाहाणी करण्यात आली. प्रत्यक्षात शहरात त्यापेक्षा तीन ते चारपट अधिक बांधकामे सुरू असल्याने पाण्याचा वापर अन्य ठिकाणीही होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

पालिकेतर्फे परिमंडळनिहाय मोठ्या प्रकल्पांची पाहणी करण्यात आली. याबाबतचा अहवाल आयुक्तांकडे दिला जाईल. यामध्ये शहरातील 727 प्रकल्पांपैकी केवळ आठ ठिकाणीच ‘एसटीपी’चे पाणी वापरले जात असल्याचे समोर आले आहे. उर्वरित बांधकामांपैकी 382 ठिकाणी टँकर व बोअरवेलचे (विंधन विहिरी) पाणी वापरले जात असल्याचे आढळले आहे आणि 18 ठिकाणी विहिरीचे अथवा झर्‍याचे पाणी वापरले जाते. त्यामुळे महापालिकेने 28 नळजोड तोडले आहेत. चार प्रकरणांत 20 हजार रुपयांचा दंडही ठोठविण्यात आला आहे.

– नंदकिशोर जगताप, पाणीपुरवठा विभागप्रमुख

हेही वाचा

Back to top button