नगर : फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक लवकरच समजेल : खा. विखे | पुढारी

नगर : फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक लवकरच समजेल : खा. विखे

नगर : पुढारी वृत्तसेवा : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकी दरम्यान झालेल्या राजकीय समीकरणावर खासदार डॉ.सुजय विखे यांनी मोठी माहिती दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मास्टर स्ट्रोक लवकरच कळेल, असे सांगतानाच बंडखोर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना भेटण्याचा सल्लाही त्यांनी दिला. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 30 जानेवारीला मतदान होत आहे.

काँग्रेसने उमेदवारी दिलेली असतानाही डॉ. सुधीर तांबे यांनी स्वतःचा अर्ज दाखल न करता, मुलगा सत्यजित यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस पक्षाशी दगाफटका केला म्हणून सुधीर तांबे यांना चौकशी होईपर्यंत, तर उमेदवार सत्यजित तांबे यांना सहा वर्षांसाठी काँगे्रस पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. या निवडणुकीसाठी भाजपचा अधिकृत उमेदवार नसून, भाजपने अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही.

यासंदर्भात खासदार विखे यांना माध्यमांनी विचारले असता ते म्हणाले, उपमुख्यमंत्री फडवणीस यांच्या मास्टर स्ट्रोकचा अनुभव यापूर्वी झालेल्या विधानपरिषद व राज्यसभेच्या निवडणुकीत आलेला आहे. आताही त्यांचा मास्टर स्ट्रोक लवकरच समजेल.
बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांच्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, त्यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना भेटावे, सगळं ठीक होईल, असं सांगताना सूचक इशाराही दिला.

Back to top button