पुणे : आकाशगंगेतील हायड्रोजन ढगांच्या संख्येत दुपटीने वाढ; 1.29 लांब ताम्रसृतीचा शोध ! | पुढारी

पुणे : आकाशगंगेतील हायड्रोजन ढगांच्या संख्येत दुपटीने वाढ; 1.29 लांब ताम्रसृतीचा शोध !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कॅनडास्थित मॅकगिल विद्यापीठ आणि बंगळुरु येथील भारतीय संस्थेतील खगोल शास्त्रज्ञांनी खोडद (पुणे) येथील मीटर तरंगलांबीच्या महाकाय रेडिओ दुर्बीणद्वारे ( ॠचठढ) केलेल्या निरीक्षणाचा वापर करत सुदूर अंतरावरच्या आकाशगंगेतील आण्विक हायड्रोजनमधून येणार्‍या रेडिओ संकेतांचा शोध घेतला आहे.  रेडिओ खगोलविज्ञानात ’21 सेंटीमीटर उत्सर्जन निरीक्षण पद्धतीमधील हा आतापर्यंतचा अद्वितीय शोध मानला गेला आहे. या शोधाचे निष्कर्ष नुकतेच बि—टनमधील रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या नियतकालिकात प्रकाशित झाला आहे.

विश्वातील अवकाशात असलेल्या आकाशगंगांदरम्यान तार्‍यांची निर्मिती होत असते. तारे हायड्रोजन मूल कणांच्या महाप्रचंड ढगांमधून निर्माण होतात. गुरुत्व बलामुळे हे मूलकण परस्परांना आकर्षित करून एकमेकांच्या जवळ येऊ लागतात. यामुळे मेघाचे वस्तुमान वाढू लागते. वाढत्या वस्तुमानाच्या ठराविक मर्यादेनंतर तो मेघ स्वतःच्या गाभ्याकडे ढासळण्यास सुरुवात होते. यामुळे केंद्र भागाची घनता वाढून गाभ्याची निर्मिती होते.

गाभ्याकडे ढासळणार्‍या अणूंच्या टकरीमधून आणि ऊर्जा अक्षयतेच्या नियमानुसार गुरुत्वीय बलाचे रूपांतर औष्णिक ऊर्जेत होते. यामुळे गाभ्याचे तापमान वाढण्यास सुरुवात होते. हीच तार्‍यांची प्राथमिक अवस्था समजली जाते. प्राथमिक अवस्थेतील तार्‍यांचे तापमान काही कोटी सेंटीग्रेडपर्यंत पोहोचल्यानंतर हायड्रोजनचे ज्वलन सुरू होते. यातून वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर होऊन ती ऊर्जा प्रकाश, उष्णता इत्यादी स्वरूपात उत्सर्जित होत राहते. यालाच तारा निर्माण झाला असे म्हणतात. हायड्रोजन ढगांची विविध स्थित्यंतरे, तारे निर्मितीच्या विविध अवस्था यांचे निरीक्षण केल्यास आकाशगंगाची उत्क्रांती समजते.

याच अनुषंगाने 21 सेंटीमीटर तरंग लांबीवरील रेडिओ प्रारणाचे विविध प्रकारे निरीक्षण होत असते. यामध्ये डॉप्लर परिणामामुळे (डॉप्लर परिणाम : प्रारणस्त्रोत म्हणजेच तरंगलांबीचे उगमस्थान आणि निरीक्षक यांच्यातील अंतर कमी होत असल्यास तरंगलांबीही कमी होणे – नीलसृती; किंवा तेच अंतर जात होत असल्यास तरंगलांबी वाढत जाणे-ताम्रसृती) आजपर्यंत मोजण्यात आलेली ताम्रसृती सर्वात जास्त म्हणजे 1.29 आढळली आहे. याच अनुषंगाने 21 सेंटीमीटर तरंगलांबीवरील रेडिओ प्रारणाचे विविध प्रकारे निरीक्षण होत असते. यामध्ये डॉप्लर परिणामामुळे आजपर्यंत मोजण्यात आलेली ताम्रसृती सर्वात जास्त म्हणजे 1.29 आढळली आहे.

याआधी रेडिओ खगोलशास्त्रात मोजण्यात आलेली ताम्रसृती 0. 376 एवढी होती. ताम्रसृतीच्या मोजमापावरून या आकाशगंगेचे पृथ्वीपासून असलेले अंतर 88 लाख प्रकाशवर्ष असल्याचे सिद्ध होत आहे. तसेच ही आकाशगंगा दीर्घ वर्तुळाकार असल्याचे दिसून येत आहे. सुदूर अंतरावरून येणार्‍या पण मार्गातील अन्य महाकाय खगोलीय घटकांमुळे वक्र झालेल्या रेडिओ प्रारणाचीही अचूक निरीक्षणे प्राप्त होतात. या नावीन्यपूर्ण संशोधनाबाबत मैकगिल विद्यापीठातील शास्त्रज्ञ अर्णब चक्रवर्ती व भारतीय विज्ञान संस्थेतील प्रा. निरुपम राय यांनी ’या सर्वात जास्त आढळलेल्याताम्रसृतीच्या निरीक्षणांमुळे भविष्यात हायड्रोजन ढगांची विविध स्थित्यंतरे समजण्यास मोठीच दिशा मिळेल’, असे सांगितले.  जीएमआरटीचे संचालक प्रमुख डॉ. यशवंत गुप्ता यांनी आकाशगंगादरम्यान असलेल्या हायड्रोजन ढगांचा शोध घेणे हा जीएमआरटीचा एक मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.

Back to top button