नगर : जेऊरमधील डोंगराला वणवा | पुढारी

नगर : जेऊरमधील डोंगराला वणवा

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुक्यातील जेऊर येथे डोंगराला लागलेला वणवा वन शमित्र पथकाच्या सतर्कतेमुळे वेळीच विझविण्यात आल्याने मोठी वनसंपदा वाचल्याची घटना गुरुवारी (दि.12) घडली.  जेऊर शिवारातील लिगाडे वस्तीनजीक असणार्‍या वन विभागाच्या घुरुडी डोंगराला वणवा लागला होता. वनविभागाशेजारी असणार्‍या सोमनाथ तोडमल यांच्या शेतामधील रोहित्रामध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली होती. सदर वणवा वनविभागाच्या हद्दीत गेल्याने मोठी वनसंपदा जळून खाक झाली असती.

घुरुडी डोंगरात वणवा लागल्याची माहिती वनमित्र पथकाला मिळाल्याने पथकातील सदस्य बापू तोडमल, मायकल पाटोळे, आकाश तोडमल, रोहित तोडमल, हर्षल तोडमल, व्हाईस चेअरमन सोमनाथ तोडमल, सनी गायकवाड, जगन्नाथ धनवळे, सूरज पवार, शेतकरी एकनाथ धनवळे यांनी घटनास्थळी जाऊन वणवा विझविला. वणव्यात सुमारे दोन हेक्टर खासगी क्षेत्र जळाले आहे. वनमित्र पथकाच्या सतर्कतेमुळे वनसंपदा वाचल्याने पथकातील सदस्यांचे कौतुक करण्यात येत आहे. तसेच जेऊर पंचक्रोशीत वणवा लागल्यास वनविभाग, तसेच वनमित्र पथकाला कळविण्याचे आवाहन पथकातील बंडू पवार, सरपंच भीमराज मोकाटे, रघुनाथ पवार यांनी केले.

Back to top button