पंतवर लवकरच होणार लिगामेंट सर्जरी | पुढारी

पंतवर लवकरच होणार लिगामेंट सर्जरी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताचा धडाकेबाज क्रिकेटपटू ऋषभ पंत याला बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या आसपास एअर अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे मुंबईत आणण्यात आले आहे. मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात त्याच्यावर पुढील उपचार डॉ. दिनशॉ पारडीवाला यांच्या देखरेखीखाली केले जाणार आहेत. ही माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूत्रांनी दिली. पंतवर लिगामेंट सर्जरी केली जाणार आहे.

अपघातामुळे पंतला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली. दिल्लीहून डेहराडूनला जातेवेळी 30 डिसेंबरला पंत याच्या कारला भीषण अपघात झाला होता. त्याच्या गुडघ्याला सतत सूज येत असून वेदनाही होत आहेत. त्यामुळे त्याचा एमआरआय करता आला नाही. अन्य जखमा भरल्या असून त्याची प्रकृतीही स्थिर आहेत. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला मोठा कालवाधी लागणार आहे. त्यामुळे पुढील काही काळ तो मैदानावर दिसण्याची शक्यता नाही. त्याचे चाहते तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.

टीम इंडियाकडून पंतला धीर

भारतीय क्रिकेट संघाने पंतसाठी खास व्हिडीओ शेअर केला आहे. त्याची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी या व्हिडीओद्वारे त्याला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. ‘तू लढवय्या आहेस, बरा हो आणि लवकर परत ये’ अशा भावना खेळाडूंनी व्यक्त केल्या. या व्हिडीओमध्ये मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, युजवेंद्र चहल, ईशान किशन, शुभमन गिल हे बिनीचे खेळाडू पंतला शुभेच्छा देताना दिसत आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button