नाशिक : मलनिस्सारण केंद्र क्षमतावाढीसाठी ३३२ कोटींचा प्रस्ताव | पुढारी

नाशिक : मलनिस्सारण केंद्र क्षमतावाढीसाठी ३३२ कोटींचा प्रस्ताव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेपाठोपाठ तपोवन व आगटाकळी मलनिस्सारण केंद्राच्या (एसटीपी) क्षमतावाढीचा ३३२ कोटींचा सुधारित प्रस्ताव मनपाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे मान्यतेसाठी सादर केला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या नवीन नियमावलीमुळे कालबाह्य मलनिस्सारण केंद्रांच्या क्षमतावाढीसाठी निधी वापरला जाणार आहे.

सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मनपाचे तपोवन येथे १३० एमएलडी, आगरटाकळी येथे ११० एमएलडी, चेहेडी येथे ४२ एमएलडी तसेच पंचक येथे ६०.५ एमएलडी अशाप्रकारे ३४२.६० एमएलडी क्षमतेचे मलनिस्सारण केंद्रे आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तत्कालीन नियमांनुसार ३० बीओटी क्षमतेनुसार मलनिस्सारण केंद्रांची उभारणी करण्यात आलेली आहे. बदलत्या काळात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने जलप्रदूषणाबाबतची नियमावली कठोर केली असून, त्यानुसार मलनिस्सारण केंद्रांतून बाहेर पडणाऱ्या प्रक्रियायुक्त सांडपाण्याची मयार्दा १० बीओटीच्या आतच असावी, असा दंडक घालण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेने ३० बीओटी क्षमतेनुसार उभारलेली मलनिस्सारणे केंद्रे कालबाह्य ठरली आहेत. शहराच्या वाढत्या विस्तार आणि वाढत्या लोकसंख्येमुळे मलनिस्सारण केंद्रे अपुरी पडत असल्यामुळे या केंद्रांचे आधुनिकीकरण आणि क्षमतावाढ करण्याची योजना मनपाने हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यात तपोवन आणि आगरटाकळी येथील मलनिस्सारण केंद्रांची क्षमतावाढ आणि आधुनिकीकरण केले जाणार आहे. यासाठी ३३२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

अमृत २ योजनेतून मलनिस्सारण केंद्रांच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध होणार आहे. अमृतअंतर्गत मनपाच्या मलनिस्सारण प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून प्रत्येकी २५ टक्के अशाप्रकारे प्रकल्प खर्चाच्या एकूण ५० टक्के निधी अनुदान स्वरूपात मिळणार आहे. उर्वरित ५० टक्के खर्च महापालिकेला स्वनिधीतून करावा लागणार आहे.

हेही वाचा :

Back to top button