Rahul Gandhi : भाजप-आरएसएस माझे गुरु ; राहुल गांधी यांची उपरोधिक टीका | पुढारी

Rahul Gandhi : भाजप-आरएसएस माझे गुरु ; राहुल गांधी यांची उपरोधिक टीका

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : ‘भाजप-आरएसएस’ माझ्यासाठी गुरु प्रमाणे आहे. काय करावे, काय करू नये, यासंदर्भात मार्ग दाखवून ते मला प्रशिक्षित करतात. माझ्यावर टीका करण्यासाठी भाजप-संघाचा आभारी आहे. जेवढे ते टीका करतात तेवढी आम्हाला सुधारणेची संधी मिळते. त्यांनी अधिक तीव्रतेने टीका करावी जेणेकरून काँग्रेस पक्ष आणि पक्षाची विचारधारा त्यांना समजेल, अशी उपरोधिक टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज ( दि. ३१ ) पत्रकार परिषदेत केली.

यावेळी राहुल गांधी म्‍हणाले की, ” विरोधी पक्षातील सर्व नेते आमच्या सोबत आहेत. देशाला जोडण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांसाठी भारत जोडो यात्रेचे दरवाजे खुले आहेत. विचारधारेत एकरूपता असते, द्वेष-हिंसेत एकरूपता नसते.

भारत जोडो यात्रे दरम्यान बुलेटप्रूफ गाडीतून कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत जावे, असे सरकारला अपेक्षित असेल, तर ते माझ्यासाठी स्वीकार्य नाही. जेव्हा त्यांचे वरिष्ठ नेते बुलेटप्रूफ गाडीच्या बाहेर येतात. तेव्हा त्यांना कुठलेही पत्र पाठवले जात नाही. आपलाच प्रोटोकॉल ते तोडतात. मग त्यांच्यासाठी प्रोटोकॉल वेगळा आणि माझ्यासाठी वेगळा. बुलेटप्रूफ गाडीतून मी कसं जावू? असा सवालही त्‍यांनी केला.  राहुल गांधी त्यांच्या सुरक्षा नियमांचे उल्लंघन करीत असतात, हे दाखवून देण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचा आरोपही त्यांनी (Rahul Gandhi) केला.

Rahul Gandhi : मी शहिदांच्या कुटुंबातून आलोय

मी शहिदांच्या कुटुंबातून आलो आहे. जेव्हा एक तरुण आपल्या प्राणाची आहुती देतो, तेव्हा त्याच्या कुटुंबियांवर किती मोठे दुःखाचे डोंगर कोसळतात, याची जाणीव आहे. परंतु, भाजप पक्षश्रेष्ठींना याची जाणीव नाही. आमच्या लष्करातील एकही जवान शहीद होऊ नये, हीच आमची इच्छा आहे. सरकार या बाबीला निष्काळजीपणाने घेऊ नये आणि लष्कराचा वापर केवळ राजकीय फायद्यासाठी करू नये. कारण याचे नुकसान केवळ जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना भोगावे लागेल, असे राहुल गांधी म्हणाले.

चीनने पहिले पाऊल डोकलाम तर दुसरे पाऊल लडाखमध्ये ठेवले

चीनने भारताचे २ हजार किलोमीटर क्षेत्र बळकावले आहे. जर, मी तुमच्या घरात घुसलो, तरी देखील तुम्ही म्हणाल की कुणी नाही घुसले, यांनी काय संदेश जाणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकार यासंदर्भात भ्रमित आहे. विरोधक जेव्हा यासंदर्भात विचारणा करतात तेव्हा सरकार लष्कराच्या मागे लपते. परंतु, सरकार आणि लष्करात फरक आहे. सरकार ने चीन प्रकरण पूर्णतः अप्रभावी पद्धतीने हाताळले आहे. चीन आणि पाकिस्तानला एक होऊ न देण्याचे धोरण काँग्रेस सरकारचे होते. परंतु, आज हे दोन्ही देश एक झाले आहेत. चीनने पहिले पाऊल डोकलाम तर दुसरे पाऊल लडाखमध्ये ठेवले. चीन तयारी करीत असून त्यामुळे प्रश्न ‘जर’ चा नाही तर ‘कधी’चा आहे. सरकारला हवाई दल, लष्कर तसेच नौदलाचे ऐकावे लागेल आणि लष्कराचा राजकीय वापर बंद करावा लागेल, असे राहुल गांधी म्हणाले. मध्यप्रदेशमध्ये पुन्हा काँग्रेस सत्तेवर येईल. भाजपने पैशांच्या बळावर सरकार बनवले असल्याने राज्यात संतापाची लाट आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button