सांगली : गॅसपाईपलाइनच्या कामावेळी पाण्याची पाईपलाईन फुटली | पुढारी

सांगली : गॅसपाईपलाइनच्या कामावेळी पाण्याची पाईपलाईन फुटली

सांगली; पुढारी वृत्तसेवा : गॅस पाईपलाईनच्या कामावेळी पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फुटल्याने सुमारे दोन लाख लिटर पाणी वाया गेले. शनिवारी दुपारी विजयनगर रेल्वेपुलाजवळ हा प्रकार घडला. पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू होते.

कुपवाड येथील कापसे वसाहत येथील पाण्याच्या टाकीतून पाईपलाईन आली आहे. या पाईपलाईनद्वारे गर्व्हमेंट कॉलनी व सैनिकनगर या दोन टाक्या भरल्या जातात. ही मुख्य पाईपलाईन विजयनगर येथील रेल्वेपुलाच्या उत्तरेला सुमारे शंभर फूट अंतरावर फुटली. भारत गॅसमार्फत या भागात गॅसपाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. गॅस पाईपलाईनसाठी अंडर ड्रिलिंगवेळी पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फुटली. दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. सुमारे दोन लाख लिटर पाणी वाया गेले. दरम्यान, पाणीपुरवठ्याची पाईपलाईन दुरुस्तीचे काम तातडीने सुरू झाले. रात्री अकरा वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल व पाणीपुरवठा सुरू होईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता ए. एम. मुलाणी यांनी सांगितले.

Back to top button