श्रीगोंदा : जगतापांनी कमावले, पाचपुतेंनी गमावले ! | पुढारी

श्रीगोंदा : जगतापांनी कमावले, पाचपुतेंनी गमावले !

अमोल गव्हाणे : 

श्रीगोंदा : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमुळे राजकीय पटलावर वेगवेगळे अन्वयार्थ काढले जाऊ लागले आहेत. बेचाळीस वर्षे तालुक्याच्या राजकारणावर अधिराज्य गाजविणार्‍या माजीमंत्री आ.बबनराव पाचपुते यांना स्वत:च्या गावातील ग्रामपंचायतीची सत्ता गमवावी लागली. तर, अवघे चौतीस वय असणार्‍या माजी आमदार राहुल जगताप यांनी बेरजेचे राजकारण करत, स्वतःच्या गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली. या दोन वेगवेगळ्या घटना असल्या तरी, तालुक्याच्या राजकारणात त्यांचे वेगळे महत्त्व आहे. जे राहुल जगताप यांना जमले, ते आ. बबनराव पाचपुते यांना का शक्य झाले नाही? त्यांची राजकीय पकड सैल झाली आहे का? असे अन्वयार्थ काढून चर्चा रंगू लागली आहे.

आ. बबनराव पाचपुते हे धुरंधर राजकारणी म्हणून राज्यात प्रसिद्ध आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी काही अपवाद वगळता बेचाळीस वर्षे आमदारकी आपल्या ताब्यात ठेवली. अर्थात यापाठीमागे त्यांनी घेतलेले कष्ट दुर्लक्षित करून चालणार नाहीत. 2014 च्या निवडणुकीत त्यांचा अनपेक्षितरित्या झालेला पराभव व 2019च्या निवडणुकीत निवडून येताना कमी झालेले मताधिक्य त्यांच्यासाठी धक्कादायक मानले जाते. पण, तरीही नाउमेद न होता त्यांनी राजकीय गतिमानता कमी होऊ दिली नाही. काष्टी गावची निवडणूक लागली अन् सगळ्या तालुक्याचे लक्ष या गावच्या घडामोडीकडे लागले. आ.पाचपुते यांची काष्टी गावावर एकहाती पकड असल्याने निवडणूक बिनविरोध होईल, असे अंदाज बांधले जात असतानाच, या निवडणुकीच्या निमित्ताने पाचपुते कुटुंबात फूट पडली. स्व. सदाशिव पाचपुते यांच्या कार्यकर्त्यांना दुय्यम स्थान दिले जात असल्याचे किंबहुना डावलले जात असल्याचे कारण पुढे करत, साजन पाचपुते यांनी आ.पाचपुते विरोधकांना सोबत घेऊन ग्रामपंचायत निवडणूक लढविली. त्यानंतरच्या घडामोडी सर्वज्ञात आहेत.

स्व. सदाशिव पाचपुते यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक. खरे पाहता निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. मात्र, तसे घडले नाही. एवढा मोठा प्रदीर्घ राजकीय अनुभव असताना पाचपुते यांच्या गटाला ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. पराभव ग्रामपंचायत निवडणुकीतील असला तरी त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा निवडणुकीत दिसून येईल अन् त्याचा फटका पाचपुते यांना बसू शकतो. माजी आमदार राहुल जगताप यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीतुन माघार घेतल्यानंतर कार्यकर्त्यांशी संपर्क वाढविला. दरम्यानच्या काळात जिल्हा बँक, कुकडी सहकारी साखर कारखाना अन् अशक्य वाटणारी पिंपळगाव ग्रामपंचायत बिनविरोध करत बेरजेचे राजकारण साध्य करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. जगताप यांनी राजकारणाचा मोठा अनुभव नसताना मोठ्या संस्था लिलया बिनविरोध केल्या. अर्थात या निवडणुका बिनविरोध करताना त्यांचे राजकीय कसब पणाला लागले एवढे निश्चित.

राहुल जगताप यांच्या वयाइतका आ.पाचपुते यांना राजकीय अनुभव आहे. मग, तरीही गावची निवडणूक त्यांना बिनविरोध का करता आली नाही? याबाबत आता राजकीय पटलावर चर्चा सुरू आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेली आघाडी पक्षासाठी नक्कीच दिलासादायक म्हणावी लागेल. जगताप यांच्यासाठी ही खास जमेची बाब असली तरी, उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना बळ देताना हातचा राखून जमणार नाही, हे तितकेच खरे.

बेलवंडीत शेलारांचा बोलबाला

बेलवंडी ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या गटाने निर्विवाद सत्ता मिळविली. त्यांचे सुपुत्र ऋषिकेश शेलार हे सरपंच झाले. या निवडणुकीच्या निमित्ताने शेलार यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली. उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची पायाभरणी यानिमित्ताने केली. या गटातून निवडणूक लढवू इच्छिणार्‍या मंडळींना या निवडणुकीची नोंद घ्यावीच लागणार आहे.

Back to top button