Stock Market Updates | आर्थिक मंदीच्या भितीने मूड खराब! शेअर बाजारातून उडाले ३.५ लाख कोटी, ‘हे’ घटक कारणीभूत | पुढारी

Stock Market Updates | आर्थिक मंदीच्या भितीने मूड खराब! शेअर बाजारातून उडाले ३.५ लाख कोटी, 'हे' घटक कारणीभूत

Stock Market Updates : जागतिक कमकुवत संकेतामुळे आज मंगळवारी (दि.२०) भारतीय शेअर बाजारात सुरुवातीपासून बाजार बंद होईपर्यंत घसरण पहायला मिळाली. सुरुवातीला सेन्सेक्स तब्बल ६६८ अंकांनी घसरून ६१,१९० वर तर निफ्टी २०० अंकांनी घसरून १८,२०० वर आला होता. त्यानंतर बाजार बंद होताना ही घसरण कमी झाली. सेन्सेक्स १०३ अंकांच्या घसरणीसह ६१,७०२ वर बंद झाला. तर निफ्टी ३५ अंकांनी खाली येऊन १८,३८५ वर बंद झाला. ऑटो, एफएमसीजी, माहिती तंत्रज्ञान आणि मेटल स्टॉक्स ०.५ टक्क्यांहून अधिक घसरल्याने सर्व प्रमुख क्षेत्रीय निर्देशांक खाली आले. वैयक्तिक शेअर्सचा विचार केल्यास डाबर इंडियाचे शेअर्स सुमारे २.५ टक्क्यांनी घसरले.

अमेरिकेतील आर्थिक मंदीची भिती, चीनमध्ये वाढलेला कोरोना

जागतिक कमकुवत संकेत, अमेरिकेतील आर्थिक मंदीची भिती आणि चीनमध्ये वाढलेला कोरोना हे घटक भारतीय शेअर बाजाराच्या घसरणीला कारणीभूत ठरले आहे. सेन्सेक्सने २०२२ च्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच चालू महिन्यात आतापर्यंत २ हजार अंक गमावले आहेत. यामुळे बीएसईवरील सर्व सूचीबद्ध स्टॉक्सच्या बाजार भांडवलात डिसेंबरमध्ये सुमारे ३.५ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. अमेरिकेतील आर्थिक मंदीच्या भितीने गुंतवणूदारांकडून भारतीय शेअर बाजारात विक्रीचा जोर सुरु आहे.

हे होते टॉप लुजर्स

मारुती सुझूकी, हिंदाल्को इंडस्ट्रीज, एचसीएल टेक्नॉलॉजीस, एसबीआय लाईफ इन्शुरन्स आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज हे निफ्टीवर आज टॉप लुजर्स होते. तर अदानी एंटरप्रायजेस, हिरो मोटोकॉर्प, ॲक्सिस बँक, एसबीआय आणि बजाज फायनान्स हे टॉप गेनर्स होते.

सेन्सेक्सवर मारुती, एचसीएल टेक, एचयूएल, एशियन पेंट्स, टेक महिंद्रा यांचे शेअर्स मागे पडले होते. तर एचडीएफसी बँक, पावर ग्रिड, सन फार्मा आणि एम अँड एम यांचे शेअर्सही खाली आले आहेत. केवळ बजाज फायनान्सचा शेअर ‍वधारला आहे. दरम्यान, भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला आहे. दुपारच्या सुमारास रुपया प्रति डॉलर ८२.८ वर होता.

जागतिक बाजारातही घसरण

व्याजदर पूर्वीच्या अंदाजापेक्षा जास्त वाढू शकतात या भीतीने सोमवारी चौथ्या दिवशी अमेरिकेतील प्रमुख निर्देशांक घसरले. आशियाई बाजारातही घसरण झाली आहे. जपानचा निक्केई निर्देशांक २.४६ टक्क्यांनी घसरून बंद झाला. हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक १.९ टक्क्यांनी खाली आला. तर चीनचा CSI300 निर्देशांक १.६२ टक्क्यांनी घसरला होता.

बँक शेअर्समध्ये तेजी, आयटीमध्ये मोठे नुकसान

यावर्षी आतापर्यंत सेन्सेक्स सुमारे ३ हजार अंकांनी वाढला आहे. तर निफ्टी ९०० हून अधिक अंकांनी वाढला आहे. मिडकॅप निर्देशांक ३ टक्क्यांनी मजबूत झाला असून स्मॉलकॅप निर्देशांक १ टक्क्यांपेक्षा कमी वाढला. BSE ५०० निर्देशांक ४.५ टक्क्यांनी मजबूत झाला आहे. तर याचदरम्यान बँक निफ्टीने २१ टक्के पॉझिटिव्ह रिटर्न दिला. निफ्टी आयटी (आयटी स्टॉक्स) सुमारे २६ टक्क्यांनी घसरला. (Stock Market Updates)

हे ही वाचा :

Back to top button