Raigad Grampanchayt Eection : म्हसळा तालुक्यात ६४.११ टक्के मतदान; १३ पैकी ७ ग्रामपंचायती बिनविरोध | पुढारी

Raigad Grampanchayt Eection : म्हसळा तालुक्यात ६४.११ टक्के मतदान; १३ पैकी ७ ग्रामपंचायती बिनविरोध

म्हसळा; पुढारी वृत्तसेवा : म्हसळा तालुक्यात संपन्न झालेल्या १३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत ७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत, तर रविवारी (दि. १८) सहा ग्राम पंचायतीमध्ये सरपंच आणि सदस्य पदासाठीची निवडणूक पार पडली. बिनविरोध ७ ग्रामपंचायती पैकी ४ ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवत सरशी घेतली आहे, तर दोन ग्राम पंचायतीमध्ये शिवसेना-उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व राहीले आहे. उर्वरित ६ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आणि सदस्य पदासाठी निवडणूक झाली असल्याने सहा सरपंचांसह अनेक ग्रामपंचायत सदस्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

म्हसळा तालुक्यात एकूण ६४.११% मतदान झालेले असून एकूण ६१४३ मतदारांपैकी ३९३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
तालुक्यातील काळसुरी, रेवली, कणघर, फळसप या ४ ग्राम पंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता प्रस्थापित होणार आहे तर कांदलवाडा आणि निगडी या ग्राम पंचायतीमध्ये शिवसेना-ठाकरे गटाची सत्ता प्रस्थापित होणार आहे. तसेच खरसई ग्रामपंचायतमध्ये खरसई विकास आघाडी म्हणून बिनविरोध घोषित करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी

तालुक्यातील संदेरी, घोणसे, देवघर, लेप, तोंडसुरे, तोराडी या ग्रामपंचायतीमध्ये काही ठिकाणी सरपंच व सदस्य पदासाठी निवडणूक झालेली आहे. निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे गट यांच्यात जोरदार रस्सीखेच झालेली पहायला मिळाली. तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी एकमेकांविरोधात निवडणूक लढवीत होते. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत दिसून येत होती. स्थानिक ग्रामस्थांसह मुंबईकर चाकरमनी देखील मतदानासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

तालुक्यात प्रत्येक मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त, व संबंधित अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते त्यामुळे म्हसळा तालुक्यात सर्वत्र शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पडली अशी माहिती नायब तहसीलदार गणेश तेलंगे यांनी दिली आहे.

एकूण मतदान – 6143 पैकी
झालेले मतदान – 3938
टक्केवारी – 64.11%

 निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती खालीलप्रमाणे

1) संदेरी
2) घोणसे
3) देवघर
4) लेप
5) तोंडसुरे
6) तोराडी

 बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती खालीलप्रमाणे

1) काळसुरी
2) रेवली
3) फळसप
4) कणघर
5) निगडी
6) कांदळवाडा
7) खरसई

हेही वाचा

Back to top button