पुणे सहकारी संस्थांचा सुधारित निवडणूक कार्यक्रम पाठवा | पुढारी

पुणे सहकारी संस्थांचा सुधारित निवडणूक कार्यक्रम पाठवा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील प्रामुख्याने अ आणि ब वर्गातील ज्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया, ज्या टप्प्यावर पुढे ढकलण्यात आल्या होत्या, त्या टप्प्यावर 21 डिसेंबर पासून त्या सुरु करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिल्यानुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित सहकारी संस्थांचे सुधारित निवडणूक कार्यक्रम प्राधिकरणाच्या मान्यतेसाठी पाठविण्याच्या सूचना जिल्हा व तालुका सहकारी निवडणूक अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत.

उच्च व सर्वोच्च यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशित केले आहे, अशा सहकारी संस्था वगळून, राज्यातील अ आणि ब वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणूका ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यांवर दिनांक 20 डिसेंबर 2022 पर्यंत पुढे ढकलण्याचा आदेश राज्य सरकारने 29 नोव्हेंबर रोजी दिला होता. एकाच वेळी राज्यात सुरु असलेल्या 7 हजार 751 निवडणुका आणि त्याचवेळी 7 हजार 147 सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम एकाच कालावधीत आला होता. त्यामुळे अ वर्गातील 38 आणि ब वर्गातील 1170 मिळून एकूण 1208 सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या.

निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या शासन आदेशास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर खंडपीठाने ज्या टप्प्यावर निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती, त्या टप्यावर 21 डिसेंबरपासून ती सुरु करण्याबाबतचे निर्देश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणास देण्यात आले. तसेच अशा संस्थांचे सुधारित निवडणूक कार्यक्रम 16 डिसेंबरपासून प्रसिध्द करण्याबाबतदेखील प्राधिकरणास निर्देश दिलेले आहेत.

त्यानुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी.एल. खंडागळे यांनी सर्व जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी आणि तालुका सहकारी निवडणूक अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये सुधारित निवडणूक कार्यक्रम 14 डिसेंबरपर्यंत प्राधिकरणास मान्यतेस्तव सादर करावेत आणि मान्यतेनंतर सुधारित निवडणूक कार्यक्रम 16 पासून स्थानिक वृत्तपत्रात प्रसिध्द करण्याबाबत कळविले आहे.

Back to top button