पुणे : पोलिस उपनिरीक्षक शारीरिक चाचणीचे बदललेले निकष स्थगित | पुढारी

पुणे : पोलिस उपनिरीक्षक शारीरिक चाचणीचे बदललेले निकष स्थगित

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) पोलिस उपनिरीक्षक पदासाठीच्या शारीरिक चाचणीच्या निकषांमध्ये करण्यात आलेले महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 साठी लागू न करण्याचा निर्णय घेतला. आता 2018 मध्ये निश्चित करण्यात आलेल्या निकषांनुसारच शारीरिक चाचणी आयोजित करण्यात येणार असून, या निर्णयामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
पोलिस उपनिरीक्षक पदासाठीच्या शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी (किमान 60 टक्के गुण) करण्याचा निर्णय 2021 मध्ये घेतला होता. तसेच 2020 च्या स्पर्धा परीक्षेपासूृन हा निर्णय लागू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, या निर्णयाला स्पर्धा परीक्षार्थींकडून विरोध करण्यात येत होता. जुन्या निकषानुसारच शारीरिक चाचणी घेण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत होती.

त्यासाठी निवेदनेही दिली होती. या पार्श्वभूमीवर शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी करण्याचा निर्णय स्थगित केल्याची माहिती एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. मुख्य परीक्षेसाठी पात्रता उमेदवारांंची शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी आवश्यकतेनुसार शारीरिक चाचणीचा सराव करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

Back to top button