नगर : पांगरमल ग्रामपंचायतीची निवडणूक गाजणार? | पुढारी

नगर : पांगरमल ग्रामपंचायतीची निवडणूक गाजणार?

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील पांगरमल ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा प्रचार सुरू असून, सरपंच बापूसाहेब आव्हाड यांनी स्वतः सरपंच असताना केलेल्या सर्व विकास कामांची चौकशी करण्याची मागणी पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली. तसेच विरोधकांकडून चुकीचा, पत घालविण्याचा प्रचार सुरू असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सरपंच आव्हाड यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे केल्याने खळबळ उडाली आहे. पांगरमल गावात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यातच विरोधकांकडून चुकीचा व अब्रू घालण्याचा प्रचार होत असल्याची तक्रार आव्हाड यांनी केल्याने पांगरमलची निवडणूक चांगलीच गाजणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

याबाबत सरपंच आव्हाड यांनी दिलेल्या निवेदनात सरपंच पदाच्या कार्यकाळात गावात विविध विकासकामे केली आहेत. कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता गावाप्रती सेवाभाव ठेवून गाव विकासाचे निर्णय घेतले. त्यामुळे येथील सर्वसामान्य जनतेने मला दोन पंचवार्षिक सेवा करण्याची संधी दिली. चालू निवडणुकीत मी सरपंच पदासाठी उमेदवार आहे. परंतु सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी उभी असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली व चुकीची तसेच जनतेची दिशाभूल करण्याचे काम विरोधकांकडून सुरू केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.

सरपंच पदाच्या काळात केलेल्या कामांच्या नावाखाली अपहार केल्याचा आरोप माझ्यावर करण्यात येत आहे. विरोधकांनी मी केलेल्या विकास कामांचे पत्रक छापून ते गावात वितरित करून माझी बदनामी करण्याचे षडयंत्र सुरू केले. विकासकामांचा खर्च हाच भ्रष्टाचाराचा आकडा दाखवून जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. अशा चुकीच्या प्रचारावर बंदी घालण्यात यावी व स्वतः केलेल्या विकासकामांच्या खर्चाची चौकशी लावावी, अशी मागणी खुद्द सरपंच आव्हाड यांनीच केली.

विरोधकांकडून चुकीची व जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. गावातील विकास कामांबद्दल अपहार केल्याचा आरोप माझ्यावर करण्यात येत आहे. तो संपूर्णतः चुकीचा असून त्याबाबत अब्रू नुकसानीचा दावा दाखल
                                                                – बापूसाहेब आव्हाड, सरपंच पांगरमल

स्वतःच्या कामाची चौकशी लावण्याची मागणी करणारा पहिलाच सरपंच

पांगरमल गावात सरपंच म्हणून कार्यरत असताना केलेल्या विविध विकासकामांची चौकशी करावी, अशी मागणी सरपंच बापूसाहेब आव्हाड यांनी गटविकास अधिकार्‍यांकडे केली. स्वतः केलेल्या कामाची चौकशी लावण्याची मागणी करण्याची ही तालुक्यातील पहिलीच घटना आहे.

Back to top button