ताथवडेतील रस्ते अंधारात ! महिनाभरापासून येथील नागरिक, व्यापारी त्रस्त | पुढारी

ताथवडेतील रस्ते अंधारात ! महिनाभरापासून येथील नागरिक, व्यापारी त्रस्त

ताथवडे : ताथवडेतील डांगेचौक-रावेत बीआरटी रस्त्यालगत असणार्‍या पवारवस्ती मुख्य रस्त्यावरील पथदिवे गेल्या महिन्यापासून बंद आहेत. यामुळे येथील रहिवाशी व व्यापारी वर्गात तीव्र नाराजी आहे. पवार वस्ती येथील पथदिवे गेल्या महिन्यापासून बंद असल्याने येथील जनजीवन विस्कळीत झालेले आहे.ताथवडे तील रस्त्यावर वाहनांची नेहमी वर्दळ असते. याच रस्त्याच्या आजूबाजूला लोकवस्तीही मोठ्या प्रमाणावर असून रात्रीच्या वेळी येथून प्रवास करताना स्थानिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

येथील महिलावर्गही रात्रीच्या वेळी येथून प्रवास करताना संकोच करत आहेत. शहरामध्ये वाढत्या सोनसाखळीच्या घटना लक्षात घेता रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने येथून प्रवास करताना पादचार्‍यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
ज्येष्ठ नागरिकांची रात्रीच्या जेवणानंतरची पायपीटही बंद झालेली आहे. याच रस्त्यालगत अनेक उपहारगृहे, खाजगी आस्थापने असल्याने येथील बंद पथदिव्यांमुळे त्यांच्या उद्योग,व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे.

त्यामुळे व्यापारी वर्गात तीव्र नाराजी आहे. स्थानिक रहिवाशी, पादचारी आणि व्यापारी वर्ग यांच्या होणार्‍या त्रासाबद्दल प्रशासन मात्र उदासीन आहे. महावितरणचे कोणतेही अधिकारी आणि कर्मचारी येथील बंद असलेल्या पथदिवे चालू करण्यासाठी प्रयत्नशील दिसत नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. लवकरात लवकर येथील पथदिवे चालू करावेत, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.

Back to top button