मुंबई : गर्दी टाळण्‍यासाठी विमानतळ प्राधिकरणाने प्रवाशांना दिला ‘हा’ सल्ला | पुढारी

मुंबई : गर्दी टाळण्‍यासाठी विमानतळ प्राधिकरणाने प्रवाशांना दिला 'हा' सल्ला

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : आंतरराष्ट्रीय प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी मुंबई विमानतळ प्राधिकरणाने एक सल्‍ला दिला आहे. यापुढे गर्दी टाळण्‍यासाठी आंतरराष्‍ट्रीय प्रवास करणार्‍यांनी साडेतीन तर देशांतर्गत प्रवाशांनी अडीच तास आधी विमानतळावर यावे. प्रवाशांची संख्या वाढल्याने गर्दीचे नियोजन करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्‍याचेही प्राधिकरणाने स्‍पष्‍ट केले आहे.

मुंबई विमानळांवरील हवाई वाहतुकीची गर्दीचा हवाई उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मागील आठव़ड्यात आढावा घेतला होता. त्यावेळी देशातील सर्व प्रमुख विमानतळांवरील सुरक्षा तपासणीच्या क्षमतेनुसार महत्त्वाच्या उड्डाणकाळांचे नियोजन करणारा आराखडा तयार करण्याच्या सूचना त्‍यांनी दिल्या होत्या. तसेच प्रवाशांच्‍या सामानाची तपासणी करणाऱ्या मशिनबाबतही आढावा घेण्‍यात यावा, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले होते.

हिवाळी सुट्या,नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बाहेरगावी जाणार्‍या प्रवाशांची संख्या वाढते आहे. येत्या दोन आठवड्यात तर प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे विमानतळांवर होणारा खोळंबा, विमानवाहतुकीची कोंडी आणि गर्दी टाळण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आंतरराष्ट्रीय प्रवास करणार्‍या सर्व प्रवाशांनी त्यांच्या बोर्डिंग वेळेच्या किमान साडेतीन तास तर देशांतर्गत प्रवाशांनी किमान अडीच तास आधी पोहोचण्यास सांगितले आहे. मुंबई विमानतळावरुन दिवसाला सुमारे ८२२ विमानाची ये-जा होते.

गेल्या वर्षी गोंधळ

गेल्या वर्षी, ऑक्टोबरमध्ये, प्रवाशांची गर्दी झाल्याने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. गर्दीमुळे तपासणीकरिता प्रवाशांना बराच वेळ रांगेत उभे रहावे लागले होते. त्यामुळे अनेकांना विमान प्रवासापासून मुकावे लागले होते.

हेही वाचलंत का?

Back to top button