वाळकी : स्वस्तात साखर मिळवून देण्याच्या आमिषाने लुटले | पुढारी

वाळकी : स्वस्तात साखर मिळवून देण्याच्या आमिषाने लुटले

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : साखर कारखान्यातून स्वस्तात साखर मिळवून देण्याचे आमिष दाखवत पुण्यातील एका व्यक्तीला चाकूचा धाक दाखवून दोन लाख 54 हजारांना लुटल्याची घटना नगर तालुक्यातील सारोळा कासार शिवारातील रेल्वे स्टेशन परिसरात गुरुवारी (दि.8) सायंकाळी घडली. याबाबत श्रीकांत सुधीर जोशी (रा.आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी जोशी व्यावसायिक असून, त्यांना सागर धनराजने सारोळा कासार परिसरात साखर कारखाना असून, या कारखान्यातून तुम्हाला स्वस्तात साखर मिळवून देतो, असे आमिष दाखवले.

त्याला भुलून जोशी गुरुवारी (दि.8) सायंकाळी अडीच लाखाची रोकड घेऊन सारोळा कासार येथे आले. सागर धनराज व त्याच्याबरोबर असलेला एक, अशा दोघांनी त्यास रेल्वे स्टेशन परिसरात निर्मनुष्य ठिकाणी नेले. तेथे कुठेही साखर कारखाना दिसून न आल्याने जोशी यांनी त्या दोघांकडे याबाबत विचारणा केली. यावेळी दोघांनी त्यांना चाकुचा धाक दाखवत त्याच्याकडील दोन लाख 50 हजाराची रोकड, एक मोबाईल, चांदीची अंगठी व पाकीटातील 250 रुपये, असा दोन लाख 54 हजार 450 रुपयांचा ऐवज हिसकावून घेतला. यानंतर त्यांना दमदाटी करून तेथून त्या दोघांनी पोबारा केला.

Back to top button