IND vs BAN 3rd ODI : भारताचे बांगलादेशसमोर ४१० धावांचे लक्ष्य | पुढारी

IND vs BAN 3rd ODI : भारताचे बांगलादेशसमोर ४१० धावांचे लक्ष्य

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताने बांगलादेशसमोर ४१० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून ईशान किशनने २१० धावा केल्या. तर विराट कोहलीने ११३ धावांची खेळी केली. भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज (दि.10) सुरु आहे.

सलामीसाठी मैदानात उतरलेल्या ईशान किशन आणि शिखर धवन जोडीने सावध सुरुवात केली होती. पण पाचव्या षटकात भारताला पहिला धक्का बसला. शिखर धवनला मेहदी हसनने पायचित केले. ईशान किशनला बऱ्याच दिवसांनी भारताकडून खेळण्याची संधी मिळाली. त्याचा पुरेपूर फायदा उठवत रोहितच्या जागी आलेल्या किशनने आपले शतक पूर्ण केले. किशन-विराट जोडीने  शानदार भागीदारी केली. २४ षटकांनंतर भारताने एक गडी गमावत १६२ धावा केल्या होत्या.

किशनने इबादत हसनच्या षटकात १८ धावा केल्या. दोन्ही फलंदाजांनी उत्कृष्ट खेळी करत भारताची धावसंख्या वेगाने पुढे नेली. किशनने वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने ८५ चेंडूत १०१ धावा पूर्ण केल्या. २५ षटकांनंतर भारताची धावसंख्या एक विकेट गमावून 170 धावा होती. टीम इंडिया मोठ्या धावसंख्येकडे वेगाने वाटचाल करत होता. यानंतर त्‍याने १०३ चेंडूत १५० धावा पूर्ण करत वीरेंद्र सेहवाग यांचा विक्रम तोडला. सेहवाग याने वेस्‍ट इंडिज विरुद्‍धच्या  इंदौरमधील सामन्यात ११२ चेंडूत १५० धावा केल्‍या होत्‍या. यानंतर त्‍याने १२६ चेंडूत ९ षटकार आणि २४ चौकार फटकावत आपलं व्‍दिशतक पूर्ण केले. शतक न झळकवता थेट व्‍दिशतकी खेळी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. ३०५ धावांवर भारताची दुसरी विकेट पडली. ३५ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूला किशन १३१ चेंडूत २१० धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत २४ चौकार आणि १० षटकार मारले. ईशानचा हा १० वा एकदिवसीय सामना होता. त्याला नवव्यांदा फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती.

३८ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूतच ३२० धावांच्या स्कोअरवर भारताची तिसरी विकेट पडली. श्रेयस अय्यर तीन धावा करून बाद झाला. इबादत हसनने त्याला लिटन दासकरवी झेलबाद केले. श्रेयसने सहा चेंडूत तीन धावा केल्या. ४० व्या षटकाच्या ५ व्या चेंडूत एबादत हुसैनने केएल राहूलला बाद केले. त्याने १० चेंडूत ८ धावा केल्या. विराट कोहली शतक झळकावून बाद झाला. कोहलीने ९१ चेंडूत ११३ धावा केल्या. त्याने खेळीत ११ चौकार आणि २ षटकार मारले. शाकिब अल हसनने त्याला मेहदी हसन मिराज करवी झेलबाद केले.

३९० धावांच्या स्कोअरवर भारताची सहावी विकेट पडली. अक्षर पटेल १७ चेंडूत २० धावा करून बाद झाला. तस्किन अहमदने त्याला क्लीन बोल्ड केले. अक्षरने आपल्या डावात एक चौकार आणि एक षटकार ठोकला. ४८ षटकांनंतर भारताची धावसंख्या ६ बाद ३९८ होती. २७ चेंडूत ३७ धावा करून वॉशिंगटन सुंदर बाद झाला. शाकिब अल हसनने त्याला बाद केले. मुस्तफिजुर रहमान याने शार्दुल ठाकूर याला बाद केले. त्याने ५ चेंडूत ३ धावा केल्या. भारताने बांगलादेशसमोर ४१० धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

भारत संघ : शिखर धवन, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार), वाशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमरान मलिक

बांगलादेश संघ : अनामुल हक, लिटन दास (कर्णधार), यासिर अली, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम (विकेट कीपर), महमुदुल्लाह, अफीफ हुसैन, मेहदी हसन मिराज, एबादत हुसैन, मुस्तफिजुर रहमान, तस्कीन अहमद

Back to top button