रायगड : पनवेल विद्यार्थी वाहक संघटनेच्या बेमुदत उपोषणला तूर्तास स्थगिती..! | पुढारी

रायगड : पनवेल विद्यार्थी वाहक संघटनेच्या बेमुदत उपोषणला तूर्तास स्थगिती..!

पनवेल; पुढारी वृत्तसेवा :  शालेय विद्यार्थी वाहतुकीसाठी परवाना नूतनीकरण करण्यासाठी शाळेचे संमतीपत्र करार कायद्याने गरजेचे आहे. मात्र शाळा प्रशासनाकडून संमतीपत्र देण्यासाठी नकार दिला जात असल्याने पनवेल विद्यार्थी वाहक संघटनेने बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज कर्नाळा स्पोर्ट अकॅडमी जवळच्या मैदानात संघटनेच्या वतीने  उपोषण करण्यात आले. यामुळे जवळपास ७०० स्कुल व्हॅन रस्त्यावर धावल्या नाहीत. उपोषणस्थळी शिक्षण आमदार बाळाराम पाटील आणि आरटीओ प्रशासनाने भेट घेत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने हे उपोषण स्थगित करण्यात आले. बुधवारी स्कूल व्हॅन नियमित पद्धतीने धावणार असल्याची माहिती पनवेल रिक्षा- विद्यार्थी वाहक संस्था अध्यक्ष पांडुरंग हूमने यांनी ‘दै. पुढारी’शी बोलताना दिली.

पनवेल तालुक्यात शहरी भागासह ग्रामीण भागात खासगी शैक्षणिक संस्था मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा सर्वाधिक असून सीबीएससी आणि स्टेट बोर्डच्या स्कूलमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेतात. ग्रामीण भागातून शहरातील शाळांमध्ये येण्यासाठी विद्यार्थी स्कूल बसेसबरोबर स्कूल व्हॅनलाही पसंती देतात. अरूंद रस्त्यांमुळे स्कूलबस ऐवजी स्कूल व्हॅन अधिक सोयस्कर असल्याने व्हॅनमधून विद्यार्थी वाहतुकीला १२- १३ वर्षापूर्वीच परवानगी देण्यात आली आहे. या व्हॅन परवानांचे नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. परंतु चालू वर्षात शाळा प्रशासन संमतीपत्र देण्यासाठी टाळाटाळ करू लागले आहे. वाहन चालकांना कारवाईचा सामना करावा लागत असल्याने  संतप्त विद्यार्थी वाहक संघटनेने स्कूल व्हॅन बंद करत बेमुदत उपोषण सुरू केले. शिक्षण आमदार बाळाराम पाटील व आरटीओ प्रशासनाने याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

आमदार बाळाराम पाटील यांनी मध्यस्थी करत याबाबत तोडगा काढण्याचे आश्नासन दिल्याने  तूर्तास आम्ही हे उपोषण पुढे ढकलले आहे.  आठ तारखेपर्यंत  संयुक्त बैठक होईल. त्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला नाही तर पुन्हा उपोषण करण्यात येईल.

–  पांडुरंग हूमने अध्यक्ष पनवेल रिक्षा विद्यार्थी वाहक संस्था

हेही वाचा :

Back to top button