श्रीगोंदा : रस्त्यावरील धुळीने घेतला एकाचा जीव ; क्रूझर वितरिकेत पडल्याने अपघात | पुढारी

श्रीगोंदा : रस्त्यावरील धुळीने घेतला एकाचा जीव ; क्रूझर वितरिकेत पडल्याने अपघात

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा :  उडणार्‍या धुळीमुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने आढळगाव शिवारात शनिवारी (दि.3) सकाळी क्रूझर गाडी थेट वितरिकेत जाऊन पडली. या अपघातात एक महिला ठार झाली असून, पाच जण जखमी झाले आहेत. या अपघाताला राष्ट्रीय महामार्गाचे काम करणारी एजन्सीच जबाबदार असून, या कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गोदावरी पांचाळ (रा.लातूर) असे अपघातातील महिलेचे नाव आहे. तर जखमी पाच जणांवर दौंड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, लातूर जिल्ह्यातील सहा जण पुण्याच्या दिशेने क्रूझर (एमएच 25-आर 2045) या गाडीतून जात होते.

आढळगाव शिवारातील वितरिका क्रमांक तेरा जवळ हे वाहन आले असता, समोरून एक ट्रक गेला. त्याच दरम्यान रस्त्यावर उडालेल्या धुळीमुळे क्रूझर गाडीच्या वाहनचालकास समोरचे काहीच दिसेनासे झाल.े त्यामध्ये ही गाडी वितरिकेत जाऊन आदळली. वाहनाचा वेग जास्त असल्याने गाडीतील गोदावरी पांचाळ या अपघातात ठार झाल्या. तर, दिगंबर पांचाळ, अश्विनी पांचाळ, मंगल सुतार व अन्य दोन प्रवाशी (रा.पोहेरेगाव, ता. रेणापूर, जि.लातूर) हे जखमी झाले. गाडी वितरिकेत पडल्यानंतर मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना गाडीतून बाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

त्यातील तिघांना जबर मार लागल्याने दौंड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी बिट अंमलदार गुलाब मोरे व किरण जाधव यांनी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

Back to top button