महिलेचा खून ; तपासासाठी पोलिस छत्तीसगडला | पुढारी

महिलेचा खून ; तपासासाठी पोलिस छत्तीसगडला

नगर :  पुढारी वृत्तसेवा :  रेल्वे स्थानक परिसरातील इंगळे वस्तीजवळील मोकळ्या जागेत मंगळवारी (दि.29) 30 ते 35 वर्षिय महिलेचा मृतदेह आढळून आला. कोतवाली पोलिसांचे एक पथक महिलेच्या खूनाचा छडा लावण्यासाठी छत्तीसगडला रवाना झाले आहे.
कोतवाली पोलिस ठाण्याचे अंमलदार संदीप थोरात यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचा मृतदेह इंगळे वस्तीत वास्तव्यास असलेल्या एका महिलेला आढळून आल्याने खळबळ उडाली होती. कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व त्यानंतर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला.

मात्र, अद्यापही महिलेची ओळख पटली नसल्याने पोलिसांसमोर आरोपींना पकडण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. दरम्यान, मृतदेहाजवळ सापडलेल्या डायरीत छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्याचा उल्लेख असल्याने पोलिसांचे एक पथक छत्तीसगड येथे रवाना करण्यात आले. तसेच मनमाड, दौंड, पुणे येथेही पथके रवाना करण्यात आली आहेत. अधीक तपास कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत.

रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्हीचा आधार

महिलेचा मृतदेह रेल्वे स्टेशनजवळ आढळून आल्याने आरोपी रेल्वेने फरार झाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे रेल्हे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांकडून तपासण्यात येत आहे.

Back to top button