संगमनेर : गायरानधारकांना म्हणणे मांडण्याची संधी ; महसूलमंत्री विखे पाटील | पुढारी

संगमनेर : गायरानधारकांना म्हणणे मांडण्याची संधी ; महसूलमंत्री विखे पाटील

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : गायरान जमीनीवर असलेल्या निवासी बांधकामांवर कोणत्याही स्वरुपाची कारवाई न करण्यच्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या महत्वपूर्ण निर्णयाचा मोठा दिलासा ग्रामीण भागातील नागरीकांना मिळाला आहे. कुठल्याही समाज घटकावर अन्याय होणार नाही, या भूमिकेतून ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबवून गायरान जमीनीवरील सर्व अतिक्रमणाबाबत म्हणणे मांडण्याची संधी महसूल विभागाने दिल्याने याचाही मोठा लाभ ग्रामीण भागाला होईल.

मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकार्‍यांसह सर्व विभागाचे प्रांताधिकारी आणि तहसिलदार यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. याबैठकीत गायरान जमीनींवरील अतिक्रमण धारकांना देण्यात आलेल्या नोटीसांचा आढावा घेण्यात आला. मंत्री विखे यांनी गायरान जमीनीवरील अतिक्रमणबाबत सर्वोच्च न्यायालयाने 2011 साली दिलेल्या निर्णयानुसार महसूल प्रशासनाने अमंलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाची मान्यता घेवून निवासी प्रयोजनार्थ असलेली अतिक्रमण नियमानुकूल करण्याची शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितल्याने मागील अनेक दिवस या विषयांवरून सुरू असलेल्या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे.

नोटीसा प्राप्त झालेल्या रहीवाश्यांनी घाबरुन जावू नये. कुठल्याही समाज घटकावर अन्याय होणार नाही हीच शासनाची भूमिका असून, सामाजिक दृष्टीकोनातून यासर्व अतिक्रमण धारकांना ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमातून आपले म्हणणे मांडण्याची संधीही उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे मंत्री विखे यांनी स्पष्ट केल्याने याविरोधात सुरू असलेली आंदोलनही आता थांबतील, अशी आशा व्यक्त केली जाते.  शासनाच्या वतीने उच्च न्यायालयात सक्षमपणे बाजू मांडण्यासाठी राज्याच्या महाआधिवक्त्यांशी आपण चर्चा करणार असल्याचे सांगून त्यांनी या विषयावर शासन संवदेनशीलपणे सर्व निर्णय करीत असल्याचा प्रत्यय दाखवून दिला.

गायरानवरील घरे कायम होणार

गायरान अतिक्रमण संदर्भात शासनाकडून आलेल्या नोटिसांमुळे गोर-गरीब, मागासवर्गीय, आदिवासींनी आपल्या तुंटपुंजीतून बांधलेल्या घरावर हातोड पडणार असल्याची भीती निर्माण होवून लोकांच्या झोपा उडल्या. मात्र महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गायरानात वास्तव्यास असलेल्याच्या घरांना कायम करण्यात येईल, या निर्णयामुळे लोकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

 

या विषयाचा अनेकांनी राजकीय स्टंट करुन वेगवेगळ्या आंदोलनांना केलेली सुरुवात पाहता ही आंदोलने सुद्धा थांबवावी. कोणाच्याही अंगावर जेसीबी घालण्यात येणार नाही. गायरान जमिनीच्या मुद्यावर विनाकारण राजकारण केले.
                                                – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

 

Back to top button