पुणे : लक्ष्मीबाई नागरी पतसंस्थेत पावणेदहा कोटींचा अपहार | पुढारी

पुणे : लक्ष्मीबाई नागरी पतसंस्थेत पावणेदहा कोटींचा अपहार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  कोथरूड येथील लक्ष्मीबाई नागरी सहकारी पतसंस्थेत पावणेदहा कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी चेअरमन राजेंद्र बाबूराव पवार यांना आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे.  संचालकांवर एमपीआयडी (महाराष्ट्र ठेवीदारांचे वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम) अ‍ॅक्टनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मीबाई नागरी पतसंस्थेच्या व्यवस्थापिका रंजना दीपक निकम, नियंत्रक अभिजित भोसले, नियंत्रक वैशाली पवार, संचालक चंद्रशेखर दिनकर देशमुख व इतर सहा संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अप्पर विशेष लेखापरीक्षक जयसिंग गायकवाड यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 ऑगस्ट 2015 ते 31 मार्च 2020 दरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतसंस्थेचे विशेष लेखापरीक्षण करण्याचे आदेश सहकार निबंधकांनी दिले होते. या लेखापरीक्षणात पतसंस्थेच्या 2015 ते 2020 या कालावधीत संस्थेचे चेअरमन पवार यांनी संस्थेतील निधी हा अनामत खात्याद्वारे स्वत:च्या फायद्याकरिता संचालक मंडळाची मंजुरी न देता पदाचा दुरुपयोग करून घेतला.

त्यासाठी इतरांनी पवार यांना मदत करून या  अपहारामुळे संस्था अडचणीत येणार असूनही बाब निबंधक कार्यालयास कळवली नाही. तसेच, नियंत्रक वैशाली पवार व अभिजित भोसले यांनी संगनमताने बोगस कर्ज नावे टाकून अपहार करण्यात आला आहे. दुबेरजी व्यवहाराने अनामत येणे, खात्याची बाकी कमी करून कमी व्याज आकारून अपहार करणे, बँक उचल खात्यावर व्याज आकारणी न करून अपहार करणे, तारण कर्ज याद्वारे संस्थेतील रकमेचा अपहार करणे. अशा विविध प्रकारे गैरव्यवहार करून 9 कोटी 74 लाख 40 हजार 169 रुपयांचा अपहार केल्याचे लेखापरीक्षणात आढळून आले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक इंदलकर तपास करीत आहेत.

6 हजार 302 ठेवीदारांच्या ठेवी व व्याज दिले नाही

ठेवीदारांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून ठेवी स्वीकारण्यात आल्या होत्या. 31 मार्च 2022 पर्यंत मुदत संपल्यानंतर देखील तब्बल 6 हजार 302 ठेवीदारांच्या ठेवी व त्यावरील रक्कम परत न देता त्यांची फसवणूक केल्याचे लेखापरीक्षणात समोर आले आहे.

आरोपी चेअरमनने पतसंस्थेतील अनामत ठेव खात्यातील 3 कोटी 51 लाख रुपये पदाचा गैरवापर करून घेतले. ते पैसे परत न भरता त्याचे व्याज देखील दिले नाही. तसेच त्याने वीस बोगस कर्ज प्रकरणे तयार करून 5 कोटी 36 लाख रुपये स्वतःच्या फायद्याकरिता वापरले. 6 हजार 302 ठेवीदारांच्या ठेवींची मुदत संपल्यानंतरही त्यांची रक्कम व व्याज परत दिले नाही. पतसंस्थेच्या लेखापरीक्षणामध्ये हा प्रकार समोर आला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर चेअरमनला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

                                   – कृष्णा इंदलकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक आर्थिक

Back to top button