Chandrasekhar Bawankule : उद्धवजी ही महाराष्ट्राची संस्कृती नाही! – बावनकुळे | पुढारी

Chandrasekhar Bawankule : उद्धवजी ही महाराष्ट्राची संस्कृती नाही! - बावनकुळे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : कोश्यारी यांनी महाराष्ट्रात आल्यापासून सातत्याने छत्रपती शिवरायांचा आदर्श जपण्याचे काम केले आहे. एखाद्या प्रसंगी अनावधनाने केलेल्या वक्तव्याचा राजकारणासाठी वापर केला जाऊ नये, राज्यपालांविषयी पार्सल वगैरे शब्द वापरणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी देखील या प्रकारची शिकवण उद्धव ठाकरे यांना दिलेली नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रात्री नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. तसेच सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे यांनी अशी बेताल वक्तव्ये केली आहे, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वक्तव्या विरोधात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  राज्यपाल कोश्यारी यांना हटवा ही मागणी केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली.  तसेच कोश्यारी यांच्याबाबत  उद्धव ठाकरे यांनी वापरलेल्या शब्दावर बावनकुळे यांनी टीका केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान त्यांना चालतो. आदित्य ठाकरे राहुल गांधींना मिठी मारतात. शरद पवार बोलले म्हणून उद्धव ठाकरे यांना बोलावेच लागले या शब्दात त्यांनी टीका केली.

विदर्भ, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ बरखास्त करणाऱ्या उद्धव ठाकरे, अजित पवार या मंडळींना नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी येण्याचा नैतिक अधिकार नाही. अडीच वर्षात कुठलेही निर्णय या सरकारने घेतले नाहीत. अनेक उद्योग परत गेले, विदर्भातील जनतेच्या अपेक्षांची पूर्तता झाली नाही. कोरोनाच्या निमित्ताने दोन वर्ष अधिवेशन देखील यांनी घेतले नाही, असा आरोपही बावनकुळे यांनी यावेळी केला. शिंदे-फडणवीस सरकार उत्तम काम करीत असून ठाकरे यांनी आता सत्तेचे स्वप्न पाहण्यापेक्षा विरोधी पक्ष म्हणून सक्षमपणे काम करावे, असा सबुरीचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा:

Back to top button