पुणे : कोश्यारी, त्रिवेदींना पदावरून हटवा : खा. उदयनराजे भोसले | पुढारी

पुणे : कोश्यारी, त्रिवेदींना पदावरून हटवा : खा. उदयनराजे भोसले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणार्‍या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांना पदावरून हटवावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या वक्तव्याचा निषेध का केला नाही? असा सवालही त्यांनी केला.

या प्रश्नावर पक्ष सोडून आंदोलनात उतरणार काय, असे विचारले असता, या प्रकरणात पक्ष नक्कीच कारवाई करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या विषयावरील आपली भूमिका सोमवारी स्पष्ट करू, असे त्यांनी सांगितले. आक्षेपार्ह वक्तव्याबाबत सर्वपक्षीयांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली. महाराजांनी लोकशाहीचा पुरस्कार केला. त्यामुळे देशात लोकशाही नांदत आहे. त्यांचे विचार कधीही जुने होऊ शकत नाहीत. यापुढे महाराजांचा अवमान केल्यास खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

शिवभक्त म्हणून माझा विरोध
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे. त्याबाबत विचारले असता, उदयनराजे म्हणाले, फडणवीस माझे मित्रच आहेत. मी पक्षाचा खासदार म्हणून हा विरोध करीत नसून, शिवभक्त म्हणून विरोध करीत आहे. पक्ष याची नक्कीच दखल घेईल. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याचेही ते म्हणाले.

Back to top button