पिंपरी : ‘सर्व्हर डाऊन’ने पासपोर्टला अडथळे | पुढारी

पिंपरी : ‘सर्व्हर डाऊन’ने पासपोर्टला अडथळे

पिंपरी : पिंपरी पोस्ट कार्यालयात ऑनलाईनद्वारे मिळालेल्या तारखेनुसार पासपोर्ट काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना मंगळवारी सर्व्हर डाऊनचा फटका बसला. शहरासह संपूर्ण देशभरात सर्व्हर डाऊन झाल्याचे पिंपरी पोस्ट कार्यालयातील अधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे दीड ते दोन महिन्यांपूर्वी अपॉइंटमेंट घेऊनसुद्धा नागरिकांना पिंपरी पोस्ट कार्यालयात ताटकळत बसावे लागले.

पिंपरी पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्रात दोनच खिडक्या असल्याने दीड ते दोन महिन्यांनंतर अपॉइंटमेंट मिळते. या तांत्रिक अडचणीमुळे ज्यांच्या पासपोर्टची प्रक्रिया मंगळवार (दि. 22) होऊ शकली नाही, त्यांना पुन्हा दोन महिन्यांनंतरची अपॉइंटमेंट मिळण्याची शक्यता आहे. पुणे क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाने ट्विट करत तांत्रिक कारणाने देशभरातच पासपोर्ट काढण्याच्या प्रक्रियेत अडथळा येत असल्याची माहिती दिली.

पिंपरी-चिंचवड परिसरासह हिंजवडी येथील आयटी विभागातील तरुण, तसेच मावळातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पिंपरी पोस्ट कार्यालयात पासपोर्ट काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. तब्बल दीड ते दोन महिन्यांच्या वेटिंगनंतर पासपोर्ट काढण्यासाठी अपॉइंटमेंट मिळते.

या कार्यालयात पासपोर्ट काढण्यासाठी नियोजित 72 जणांचे अर्ज आले होते; मात्र पाच वाजेपर्यंत केवळ 25 पासपोर्ट काढण्यात आले होते. कार्यालयाकडून 50 जणांना टोकन देऊन थांबवण्यात आले होते. दुपारनंतर सर्व्हर सुरू होऊनसुद्धा तांत्रिक अडचणी येत असल्याने काम संथगतीने सुरू होते.

पासपोर्ट काढण्यासाठी दीड ते दोन महिन्यांनंतरची वेळ मिळते. म्हणून बर्‍याच नागरिकांनी यासाठी कार्यालयातून सुटी घेतली होती. नियोजित 72 नागरिकांना मंगळवार (दि. 22) दिली होती. यामधील केवळ 50 लोकांनाच टोकन दिले होते; मात्र उर्वरित लोकांना नाहक हेलपाटा झाला. उर्वरित लोकांना 18 जानेवारीनंतरची अपॉइंटमेंट मिळणार असल्याची माहिती विभागाने दिली.

Back to top button