अमेरिकेचा खरा मित्र कोण? भारत की पाकिस्तान; अमेरिकेने दिले खास उत्तर | पुढारी

अमेरिकेचा खरा मित्र कोण? भारत की पाकिस्तान; अमेरिकेने दिले खास उत्तर

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचा कोणत्या देशाकडे अधिक कल आहे, भारत की पाकिस्तान यावर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने उत्तर दिले आहे. भारत हा अमेरिकेचा जागतिक मित्र आहे, तर पाकिस्तान दक्षिण आशियातील अमेरिकेचा महत्त्वाचा मित्र आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते वेदांत पटेल म्हणाले की, भारत हा केवळ आशियातीलच नव्हे तर जागतिक पातळीवर अमेरिकेचा महत्त्वाचा मित्र आहे.

वेदांत पटेल पुढे म्हणाले की, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंगन आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यातील संबंध खूप मजबूत आहेत. डॉन या इंग्रजी वृत्तपत्राच्या भारत-अमेरिका संबंधावरील प्रश्नावर एक अधिकारी म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून चांगले संबंध आहेत. ज्याचे महत्व देखील अमेरिकेला माहित आहे. अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानच्या अंतर्गत राजकीय अस्थिरतेचा अमेरिका आणि पाकिस्तानमधील संबंधांवर परिणाम होत नाही. दोन्ही देशांमधील संबंध नेहमी सारखेच राहिले आहेत.

पाकिस्तानला भारत किंवा अफगाणिस्तानच्या दृष्टिकोनातून पाहत नाही, असेही अमेरिकेने स्पष्ट कले आहे. भारत, चीन, इराण, अफगाणिस्तान यांच्याशी सीमारेषा सामायिक करणारा एक महत्त्वाचा देश म्हणून अण्वस्त्र बलवान पाकिस्तान मानतो, असे अमेरिकेच्या वतीने सांगण्यात आले.

भारताच्या जी-२० परिषदेच्या अध्यक्षतेला अमेरिकेचे समर्थन

इंडोनेशियामध्ये झालेल्या जी-२० परिषदेत भारताला २०२३ च्या परिषदेचे अध्यक्षपद सोपविले आहे. जी-२० परिषदेच्या अगोदर कंबोडिया येथे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यामध्ये बैठक झाली होती. दोन्ही देशांमधील भागीदारी वाढवणे आणि युक्रेनमधील रशियाच्या युद्धाचा प्रभाव कमी करण्यावर चर्चा झाल्याच्या अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांनी या बैठकीनंतर सांगितले होते. यासोबतच ब्लिंकेन पुढे म्हणाले की, जी-20 परिषदेत भारताच्या अध्यक्षपदाला अमेरिकेचा पाठिंबा असल्याचेही ब्लिंकेन यांनी सांगितले.

पाकिस्तानमध्ये अमेरिकेची सर्वात मोठी परकीय गुंतवणूक

पाकिस्तानबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे आहे की, अमेरिका अनेक मुद्द्यांवर पाकिस्तानसोबत एकत्र काम करत आहे. ऊर्जा, व्यवसाय, गुंतवणूक, आरोग्य, स्वच्छ ऊर्जा, हवामान संकट निवारण, अफगाणिस्तानातील स्थिरता आणि दहशतवादाविरुद्धची लढाई यांचा यामध्ये समावेश आहे. पाकिस्तानमध्ये परकीय गुंतवणुकीत (एफडीआय) अमेरिकेचा सर्वात मोठा वाटा आहे,असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे.

‘जी-20’मधील पंतप्रधान मोदींच्या भूमिकेचे अमेरिकेकडून कौतुक

जी-20 शिखर परिषदेच्या वतीने जारी करावयाच्या संयुक्त निवेदनातील मुद्द्यांबाबत सर्व सहभागी राष्ट्रांची सहमती मिळवण्याचे अशक्य वाटणारे काम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झाले. त्यामुळे आण्विक अस्त्रांच्या वापराबाबतच्या वाढत्या धोक्याबाबत या संयुक्त निवेदनात उल्लेख करता आला, असे गौरवोद्गार अमेरिकेने काढले आहेत. अमेरिकेचे मुख्य राष्ट्रीय सुरक्षा सहसल्लागार जॉन फिनर यांनी हे उद्गार काढले आहेत. भारतीय अमेरिकी समुदायासमोर बोलताना फिनर म्हणाले की, सामाईक विषयांवर एक जागतिक भूमिका आणि अजेंडा ठरवण्यासाठी अमेरिका आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आता याबाबतीत भारताकडे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सहकारी म्हणून आशेने बघत आहेत. इंडोनेशियात बाली येथे झालेल्या जी-20 शिखर परिषदेत कळीच्या विषयांवर सर्वसहमती व्हावी यासाठी मोदी यांनी केलेले प्रयत्न स्तुत्य आहेत. आण्विक अस्त्रांचा वापर आणि विविध देशांसाठी संवेदनशील विषयांवर सर्वच सदस्य देशांची सहमती होणे अवघड असते. त्या-त्या देशांचे हित बघून त्यात बाधा न आणता सर्वसहमती मिळवण्याचे काम मोदी यांनी केले. भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजितसिंग संधू म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष बायडेन यांच्या आतापर्यंत 15 भेटी झाल्या आहेत.

हेही वाचा :

Back to top button