औरंगाबाद : राज्यपाल कोश्यारींविरोधात मराठा मोर्चा आक्रमक | पुढारी

औरंगाबाद : राज्यपाल कोश्यारींविरोधात मराठा मोर्चा आक्रमक

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात राज्यभरातील मराठा समाज आक्रमक होऊन रस्त्यावर उतरला आहे. रविवारी औरंगाबादेतील क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्चा व मराठा समाजातर्फे जोरदार निदर्शने करुन रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यासोबतच राज्यपाल कोश्यारी यांची काळी टोपी जाळून तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. राज्यपाल कोश्यारी हे जोपर्यंत या पदावरून हटणार नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. यावेळी पोलीस आणि आंदोलकांत किरकोळ झटापटही झाली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत समारंभात बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. आताचे आदर्श केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आहेत. त्यांच्या या विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा रस्त्यावर उतरला आहे. क्रांती चौकात झालेल्या आंदोलनात ‘राज्यपाल कोश्यारी हटाव’, महाराष्ट्र बचाव’ यासह विविध घोषणा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिल्या. रस्त्यावर येत रस्ता रोको केला. दरम्यान, आक्रमक झालेल्या आंदोलकांनी कोश्यारी यांचे फोटो तसेच काळी टोपी जाळत संताप व्यक्त केला.

राज्यपाल कोश्यारी हे जोपर्यंत या पदावरून हटणार नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. यावेळी पोलीस आणि आंदोलकांत किरकोळ झटापटही झाली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. या आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक प्रा. चंद्रकांत भराड, सुनील कोटकर, रमेश गायकवाड, रेखाताई वहाटुळे यांच्यासह मोठ्या संख्येने समन्वयक उपस्थित होते. दरम्यान, आंदोलनात विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सहभाग घेत जोरदार घोषणा दिल्या. तसेच ही प्रवृत्ती ठेचलीच पाहिजे, असे म्हणत भाजपचे नेते आता रस्त्यावर उतरतील का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावेळी पोलिसांनी त्यांनाही अटक केली.

हेही वाचा : 

Back to top button