बाहेरच्या हवेचा वापर करून कारमध्ये तयार होते पाणी; ‘या’ कंपनीचा क्रांतिकारी शोध, एका लिटरला येतो २० पैसे खर्च | पुढारी

बाहेरच्या हवेचा वापर करून कारमध्ये तयार होते पाणी; 'या' कंपनीचा क्रांतिकारी शोध, एका लिटरला येतो २० पैसे खर्च

तेल अव्हिव, वृत्तसंस्था : धावत्या कारमध्ये बाहेरच्या हवेचा वापर करून आत पिण्यायोग्य पाणी तयार करणारे उपकरण इस्रायलच्या एका कंपनीने विकसित केले आहे. या उपकरणाच्या माध्यमातून अवघ्या 20 पैशात एक लिटर पाणी तयार होऊ शकते. पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेले देश तसेच भारतासारख्या देशात हे उपकरण उपयुक्त ठरू शकते.

जिनियस अ‍ॅटमॉस्फेरिक जनरेटर हे उपकरण इस्रायलच्या वॉटरजेन कंपनीने तयार केले आहे. 2019 च्या लास वेगासमधील इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये ते सादर करण्यात आले होते. त्याचे कार व्हर्जन आता कंपनीने तयार केले आहे. त्या आधी कंपनीने ‘जेनी’ या नावाने घर आणि कार्यालयात बसवता येईल, असे उपकरण तयार केले होते. आता त्यात सुधारणा करून ते कारमध्येही बसवता येईल, असे त्यात बदल करण्यात आले आहेत. या संशोधनाला लास वेगासमध्ये पारितोषिकही मिळाले होते.

वॉटरजेनचे अध्यक्ष येहुदा काप्लून यांनी सांगितले की, या संशोधनामुळे ऑटोमोबाईल उद्योगात क्रांतिकारी बदल होऊ शकतात. फोर्ड या नामांकित कार कंपनीने पुढील संशोधन व कारमध्ये बसवण्याबाबत कंपनीशी करार केला असून त्यातून कारसोबतच ही यंत्रणा कशी देता येईल यावर काम सुरू आहे. याशिवाय इतर कार कंपन्याही कंपनीसोबत बोलणी करत आहेत. प्रवासात जाताना पाण्याचा साठा बाळगणे, त्यायोगे प्लास्टिकचा वाढता वापर, पाण्याचा खर्च हे सारे सव्यापसव्य या नव्या उपकरणामुळे बंद होणार आहेत.

असे काम करते हे उपकरण

जेनी नावाचे हे उपकरण कारच्या बाहेरची हवा आत शोषून घेते व त्याला उपकरणाद्वारे दमट हवेत रूपांतर करून ही हवा बाष्पाचे पाण्यात रूपांतर करू शकेल, या तापमानापर्यंत आणते. त्यामुळे पाण्याचे थेंब तयार होतात, थोड्या वेळातच कारमध्ये पाणी तयार होऊन गोळा व्हायला सुरुवात होते. विशेष म्हणजे बाहेरच्या हवेचा वापर करताना हे उपकरण हवेतील प्रदूषण घटक वेगळे करते. तसेच बाष्प तयार झाल्यावर निर्माण होणार्‍या पाण्याचे त्याच टप्प्यावर शुद्धीकरण करते. त्यामुळे शुद्ध पाणीच तयार होते. एका कंटेनरमध्ये हे पाणी जमा होते. 50 किलो वजनाचे हे यंत्र दिवसभरात 20 लिटर पाणी तयार करू शकते. या यंत्रणेला लागणारा खर्चही फारसा नाही. एका लिटर पाण्यासाठी 20 पैसे खर्च येतो.

Back to top button