पुणे : 20 माजी नगरसेवकांना घरचा रस्ता दाखविणार! पालकमंत्री चंद्रकांत पाटील | पुढारी

पुणे : 20 माजी नगरसेवकांना घरचा रस्ता दाखविणार! पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष अशी पदे प्रत्येकाला हवी असतात. मात्र, संघटनेचे काम म्हटले की काही मंडळी पाठ फिरवितात. अशा सुमारे 15 ते 20 माजी नगरसेवकांची यादीच मी तयार केली आहे. महापालिका निवडणुकीत त्यांना घरचा रस्ता दाखविला जाणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठणकावले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या निवडणूकीसाठी मंत्री पाटील यांनी शुक्रवारी सर्व आमदार आणि माजी नगरसेवक यांची बैठक बोलविली होती.आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकिर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी सभागृह नेते गणेश बिडकर उपस्थित होते. मात्र या बैठकीला केवळ 60 ते 65 माजी नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे पाटील यांनी उपस्थितांचा चांगलाच समाचार घेतला.

एवढे काय महत्त्वाचे काम असते की, निमंत्रण देऊनही अनेक जण बैठकीला आलेले नाहीत, अशी विचारणा करीत त्यांनी अनुपस्थित असलेल्यांची यादीच मागविली. प्रत्येकाला महत्त्वाची पदे हवी असतात. संघटनेचे काम म्हटले की मात्र ही मंडळी गायब असतात. संघटनेच्या कामापासून सतत दूर असणार्‍या अशा 15 ते 20 जणांची यादी माझ्याकडे आहे.

त्यांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी देणार नसल्याचे स्पष्ट करीत त्यांच्याऐवजी काम करणार्‍यांना आणि काही ठिकाणी अन्य पक्षातून आलेल्या इच्छुकांना उमेदवारी दिली जाईल असेही या बैठकीत त्यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच सत्ता येण्यापूर्वी अनेक जण पक्ष सोडून चालले होते. आता मात्र सगळे थांबले आहेत. जे निघाले होते, त्यांच्याकडे आपण बघणार असल्याचे सांगत सिनेटची निवडणूक ही नगरसेवकपदाची निवडणूक समजून सर्व उमेदवारांचा प्रचार करा, सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले पाहिजेत असेही त्यांनी बजाविले.

अजित पवारांचाही फोन येतो आहे
सिनेटच्या निवडणुकीत मदत करा, यासाठी काही पदाधिकार्‍यांना थेट विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार फोन करीत आहेत. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक किती गांभीर्याने घेतली आहे, हे लक्षात घ्या. सर्वांनी सक्रिय होऊन काम करावे. महापालिकेच्या लांबलेल्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत होतील, असा अंदाज आहे. त्यादृष्टीने तयारीला लागा, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

Back to top button