मंगल सोहळ्याने हटली खड्ड्यांची साडेसाती ! एका रात्रीत बुजविले खड्डे | पुढारी

मंगल सोहळ्याने हटली खड्ड्यांची साडेसाती ! एका रात्रीत बुजविले खड्डे

नगर : पुढारी वृत्तसेवा : ना प्रस्ताव, ना टेंडर, वर्कऑर्डर तर दूरची गोष्ट, पण तरीही बाजुच्या खुर्चीवर बसून महापालिका चालविणार्‍या ‘भाऊ’साठी प्रशासन राबराब राबले. त्यामुळेच एका रात्रीत चाणक्य चौक ते नक्षत्र लॉनपर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे बुजविले गेले. निमित्त होते, भाऊंच्या घरातील मंगलसोहळ्याचे. शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डेच खड्डे बुजविण्याला विलंब करणार्‍या महापालिकेने मात्र पदाधिकार्‍यांच्या सोहळ्यासाठी पायघड्या घातल्या. महापालिका प्रशासनाने मात्र त्याबाबत कानावर होत ठेवत ‘त्या’ ठेकेदाराकडे बोट केले. बुरूडगाव रस्त्यावरील खड्डे नेमके कोणी बुजविले, पदाधिकार्‍याच्या शब्दाखातर ‘माया’ळू झालेला तो ठेकेदार कोण? या प्रश्नाभोवती महापालिका वर्तुळात चर्चा रंगली आहे.

शहरात पावसाळ्यापूर्वी काही रस्त्यांचे पिचिंग केले होते. मात्र, यंदा अतिपाऊस झाल्याने सर्वच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. नगर शहरातील रस्ते सोशल मिडीयाच्या माध्यमातून जगभर पोचले आहेत. अनेकांनी रस्त्यासोबत सेल्फी घेऊन महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे ददरोज शहरात छोटे-मोठे अपघात होत आहेत. अनेकांना मणक्याचे आजार जडले आहेत. वयोवृद्धांनी नगर शहरातील रस्त्यावरून दुचाकी चालू नये, अशी अवस्था निर्माण झाली आहे. पुण्या-मुंबईला गेलेले नगरकर पुन्हा नगरमध्ये येण्यास इच्छुक नाहीत.

अशी परिस्थिती असताना बुरूडगाव रस्त्यावरील चाणक्य चौक ते नक्षत्र लॉनपर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे एका रात्रीत कसे बुजविण्यात आले आणि कशासाठी बुजविण्यात आले, याची चर्चा पालिका वर्तुळासह बुरूडगाव रोड परिसरात सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बुरूडगाव रस्त्यावरील एका मंगल कार्यालयामध्ये महापालिकेच्या पदाधिकार्‍याच्या नातेवाईकाचा कौटुंबिक सोहळा होता. त्याच्या अगोदर एक दिवस बुरूडगाव रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले. मग एवढी तत्परता शहरातील अन्य रस्त्यासांठी का दाखविली जात नाही, असा सवाल नागरिक करीत आहेत. याबाबत मनपा अधिकार्‍यांशी चर्चा केली असता ते म्हणाले की आम्हाला याबाबत अद्याप तरी काही माहिती नाही. याबाबत आम्हालाच चौकशी करावी लागेल.

शहरातील खड्डेही बुजवा की..!
महापालिकेचे कामे घेणार्‍या ठेकेदाराने हे खड्डे बुजविल्याची चर्चा शहरात आहे. मात्र त्यासाठी आवश्यक ते सोपस्कर पूर्ण झाले नसल्याचेही प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले. ‘भाऊं’च्या शब्दाखातर ठेकेदाराने तत्परता दाखविली. ‘बील काढून देतो’ या शब्दपूर्तीचे पुढे काय होते? याचीच आता उत्सुकता लागून आहे. ‘भाऊ’च्या शब्दाला मान देणार्‍या या ठेकेदाराने अशाच पध्दतीने शहरातील खड्डे बुजविण्याचा ‘मायाळूपणा’ दाखवावा, अशी अपेक्षा नगरकर व्यक्त करत आहेत.

Back to top button