पाकिस्तानच्या विजयाचे ‘हे’ आहेत 5 ठळक मुद्दे, जाणून घ्या आकडेवारी | पुढारी

पाकिस्तानच्या विजयाचे ‘हे’ आहेत 5 ठळक मुद्दे, जाणून घ्या आकडेवारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचा संघ टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. बुधवारी झालेल्या सेमी फायनलमध्ये त्यांनी न्यूझीलंडचा एकतर्फी सामन्यात 7 गडी राखून पराभव केला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शाहीन शाह आफ्रिदीने आक्रमकपणे किवींच्या टॉप ऑर्डरला खिंडार पाडले. त्यानंतर न्यूझीलंडने 20 षटकांत 4 विकेट्सच्या मोबदल्यात 152 धावा करून पाकिस्तानसमोर विजयासाठी 153 धावांचे लक्ष्य ठेवले. (pakistan team winning factors against new zealand in t20 world cup semi final)

प्रत्युत्तरात पाकिस्तानची सलामी जोडी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी जबरदस्त सुरुवात केली. दोघांनी 105 धावांची भागिदारी करून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. बाबर 53 आणि रिझवान 57 धावा करून बाद झाला. त्यानंतर हारीस, मसूद आणि इफ्तिकार अहमद यांनी पाकिस्तानच्या विजयावर मोहोर उमटवली. आजच्या सामन्यात पाकचा संघ गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात मजबूत दिसला. त्यांनी 13 वर्षांनंतर टी-20 विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. आजच्या सेमी फायनलमध्ये असे काही घटक होते, ज्यामुळे पाकिस्तानने अंतिम फेरी गाठली. चला त्या महत्त्वाच्या पाच घटकांवर नजर टाकूया… (pakistan team winning factors against new zealand in t20 world cup semi final)

1. शाहीन आफ्रिदीची अचूक गोलंदाजी (shaheen afridi)

वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने महत्त्वपूर्ण सामन्यात पाकिस्तान संघाला सुरुवातीलाच यश मिळवून दिले. या सामन्यात त्याने महत्त्वाचे 2 बळी घेतले. त्याने सामन्याच्या पहिल्याच षटकाच्या तिस-या चेंडूवर न्यूझीलंडचा आक्रमक सलामीवीर फिन ऍलन याला पायचीत केले. यानंतर कर्णधार केन विल्यमसनने क्रीजवर उभे राहून मोठे फटके खेळायला सुरुवात केली. विल्यमसन 46 धावांवर असताना 17व्या षटकात शाहीनने त्याची विकेट घेतली. दोन्ही विकेट निर्णायक प्रसंगी पडल्या. मुख्य म्हणजे शाहीनने 4 षटकात केवळ 24 धावा दिल्या. त्याचा इकॉनॉमी रेट 6 होता.

3. शादाबच्या अचूक थ्रोवर धावबाद (Shadab Khan)

फिन ऍलनच्या विकेटनंतर केन विल्यमसनने न्यूझीलंडच्या डावाची धुरा सांभाळली. कॉनवे आणि त्याच्यात चांगली भागीदारी होईल असे दिसत होते. त्याचवेळी सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धाव चोरताना कॉनवे धावबाद झाला. शादाबच्या अचूक थ्रो ने किवी संघाला दुसरा झटका बसला. कॉनवे मिड-ऑफच्या दिशेने चेंडू खेळून एकल चोरण्याचा प्रयत्न करत होता. हा चेंडू शादाब खान कडे गेला. त्याने वेगाने नॉन स्ट्रायकरच्या बाजूच्या विकेट्सकडे चेंडू फेकला तो थेट स्टंपवर आदळला. कॉनवे 21 धावा करू शकला.

3. बाबर – रिजवानची धडाकेबाज सुरुवात (babar azam and mohammad rizwan)

आतापर्यंत या स्पर्धेत बाबर-रिझवान ही सलामीची जोडी सातत्याने अपयशी ठरत होती. मात्र उपांत्य फेरीत ही जोडी पुन्हा एकदा लयीत दिसली. 153 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी पाकिस्तानला शानदार सुरुवात करून दिली. या विश्वचषकात पॉवर प्ले दरम्यान पाकिस्तानच्या सलामीवीरांमध्ये पहिल्यांदाच 50 धावांची भागीदारी पाहायला मिळाली. दोघांमध्ये सलामीच्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी झाली.

4. जुन्या चेंडूसह सर्वोत्तम गोलंदाजी

सिडनीच्या मैदानावर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी जुन्या चेंडूचा पुरेपूर वापर केला. संपूर्ण सामन्यात संघ लयीत दिसला. सर्व गोलंदाजांनी जुन्या चेंडूने चांगली कामगिरी केली. एकाही गोलंदाजाने 8.25 पेक्षा जास्त इकॉनॉमी दिली नाही.

5. बाद फेरीत न्यूझीलंड दबावाखाली खेळला

न्यूझीलंडचा संघ अनेकदा महत्त्वाच्या वेळी चुका करतो. यावेळीही तेच घडले. वनडे आणि टी-20 विश्वचषकाबद्दल बोलायचे झाल्यास एकूण 20 विश्वचषक झाले आहेत. यापैकी न्यूझीलंडने 12 वेळा उपांत्य फेरी गाठली आहे. पण न्यूझीलंडने आजपर्यंत एकही विश्वचषक जिंकलेला नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे द. आफ्रिकेच्या संघाप्रमाणे न्यूझीलंडचा संघही बाद फेरीच्या सामन्यात दबावाखाली खेळताना दिसतो. याआधी न्यूझीलंडने 2015, 2019 आणि 2021 च्या विश्वचषक स्पर्धेत फायनलमध्ये प्रवेश केला होता. पण त्यांना एकदाही वर्ल्ड कपवर नाव करता आलेले नाही. (pakistan team winning factors against new zealand in t20 world cup semi final)

Back to top button