दिवाळीत प्रवासाचा पुणेकरांचा उच्चांक; एसटी, रेल्वे आणि विमान प्रवाशांच्या संख्येत वाढ | पुढारी

दिवाळीत प्रवासाचा पुणेकरांचा उच्चांक; एसटी, रेल्वे आणि विमान प्रवाशांच्या संख्येत वाढ

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दिवाळीपूर्वी बाहेरगावी जाणार्‍या प्रवाशांमुळे सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या एसटीसह रेल्वे, विमानांना प्रचंड गर्दी झाली होती. परिणामी या सेवांच्या नियमित प्रवासी संख्येत 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. प्रवासी संख्या वाढल्याने या सेवांना दिवाळी काळात भरघोस उत्पन्न मिळाले. पुणे शहरात कामधंद्यासाठी येणार्‍या नागरिकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. हे नागरिक दिवाळी सणाकरिता दिवाळीपूर्वी आपल्या मूळ गावी परतत होते.

त्यामुळे पुण्यातून बाहेरगावी जाणार्‍या एसटी आणि रेल्वेच्या गाड्यांना प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे प्रशासनाने विशेष अतिरिक्त गाड्यादेखील यावेळी चालविल्या. एसटी, रेल्वेप्रमाणेच विमान प्रवाशांच्या संख्येतदेखील वाढ झाल्याचे यावेळी निदर्शनास आले. त्यामुळे इतर दिवसांपेक्षा या काळात प्रवासी संख्या वाढली आणि एसटी, रेल्वे स्थानक आणि विमानतळावर प्रवाशांच्या गर्दीने उच्चांक गाठला. गर्दी आटोक्यात आणण्यासाठी या प्रशासकीय यंत्रणांना मोठी कसरत करावी लागली होती.

एकाच दिवशी 170 उड्डाणे
दिवाळी काळात एसटीच्या पुणे विभागाच्या दिवसाच्या नियमित प्रवासी संख्येत 25 ते 30 हजारांनी वाढ झाली होती. पुणे रेल्वे स्थानकावरून जाणारी प्रवासी संख्या 60 ते 70 हजारांनी वाढली होती. पुणे विमानतळावरून इतर दिवशी दिवसाला 120 ते 130 च्या घरात विमानांची उड्डाणे होतात. दिवाळीपूर्व काळात मात्र 21 तारखेला एकाच दिवशी विमानांची 170 उड्डाणे झाली.

उत्पन्न घटले
शहरातील नागरिक बाहेरगावी गेल्याने शाळांना आणि कामगारांना सुट्या असल्यामुळे पीएमपीचे प्रवासी तब्बल 30 टक्क्यांनी घटले. इतर दिवशी पीएमपीद्वारे दिवसाला 12 लाख प्रवासी प्रवास करतात. परंतु, दिवाळी काळात दिवसाची प्रवासी संख्या 12 वरून 9 लाखांवर आली होती. परिणामी पीएमपीच्या उत्पन्नात 50 लाखांनी घट झाली. त्यामुळे मार्गावरील बहुतांश गाड्या बंद कराव्या लागल्या.

एसटीच्या पुणे विभागाची प्रवासी संख्या
इतर दिवशी रोजची – 1 लाख 25 हजार प्रवासी
दिवाळी काळातील रोजची – 1 लाख 55 हजार प्रवासी
इतर दिवशी रोजचे उत्पन्न – 90 ते 95 लाख रुपयांपर्यंत.
दिवाळी काळातील रोजचे उत्पन्न – 1 कोटी 45 लाखांपर्यंत.

रेल्वेची प्रवासी संख्या
इतर दिवशी दररोज – 70 ते 80 हजार प्रवासी
दिवाळी काळात दररोज – 1 ते दीड लाख प्रवासी

विमानतळावरील प्रवासी संख्या
(दि. 21 ऑक्टोबर 2022)
आगमन – 85 विमाने – 11 हजार 886 प्रवासी
निर्गमन – 85 विमाने – 14 हजार 305 प्रवासी

Back to top button