पुणे : एकतीस वर्षीय तरुणाचा कार अपघातात मृत्यू; पाच जण जखमी; एक गंभीर | पुढारी

पुणे : एकतीस वर्षीय तरुणाचा कार अपघातात मृत्यू; पाच जण जखमी; एक गंभीर

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मित्राचा वाढदिवस करून मध्यरात्री घरी परतताना कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात एका तरुणाच मृत्यू झाला. यात अन्य पाच जण जखमी झाले असून, एक तरुण गंभीर आहे. ही घटना सोमवारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास होळकर पुलाजवळ घडली. अमित रघुनाथ ढमढेरे (वय 31, रा. वडगाव शेरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अमितचे वडील रघुनाथ ढमढेरे (वय 58) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अमित, त्याचा मित्र अभिषेक गायकवाड व अन्य चौघे असे एकूण सहा जण सोमवारी रात्री त्यांच्या मित्राच्या वाढदिवसासाठी गेले होते. वाढदिवस झाल्यानंतर ते सर्वजण एकाच कारमधून खडकी येथील मुळा रस्त्याने वडगाव शेरी येथील त्यांच्या घरी येत होते. अभिषेक हा कार चालवित होता. दरम्यान, कार भरधाव असल्याने होळकर पुलाजवळील चंद्रमा चौकाकडे येणार्‍या रस्त्यावरील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप (बीईजी) बसथांब्यासमोर अभिषेकचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यात असणार्‍या दुभाजकाला धडकली.

त्यानंतर कार पलटी झाल्याने सहाही जणांना दुखापत झाली. अमित हा डाव्या बाजूला बसलेला असल्याने त्याच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच अभिषेक यालाही गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वी अमितचा मृत्यू झाला. अन्य चौघे किरकोळ
जखमी आहेत.

Back to top button