नाशिक: दिवाळी वाटप करतानाच, गर्भवतीची प्रसूती करत दाखवले माणुसकीचे दर्शन | पुढारी

नाशिक: दिवाळी वाटप करतानाच, गर्भवतीची प्रसूती करत दाखवले माणुसकीचे दर्शन

नाशिक (निफाड); पुढारी वृत्तसेवा 

वनसगाव (ता.निफाड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. कलीम पठाण आणि आरोग्य अधिकारी दिवाळीनिमित्त आपल्या सहकाऱ्यांसोबत  वनसगाव-ब्राह्मणगाव रस्त्यावरील वस्त्यांवर कपडे, फराळ, आणि फटाके वाटत होते. यातच एका झोपडीत हे दिवाळीचे साहित्य द्यायला गेले असता, डॉ. पठाण यांनी दिपाली महाले (वय 24) या गरोदर महिलेला विव्हळताना पाहिले. त्यांनी १०८ रुग्णवाहिकेला फोन करून याबद्दल माहिती दिली; पण  रुग्णवाहिका येण्यासाठी वेळ लागणार होता. तेव्हा डॉ. कलीम यांनी या महिलेची परिस्थिती पाहून तात्काळ प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. डॉ. पठाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कृतीतून माणुसकीचे दर्शन घडले आहे.

डॉ. कलीम यांनी या झोपडीतच आवश्यक साधनांची जमवाजमव करत, आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने या महिलेची प्रसूती केली. यानंतर या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला, पण पुन्हा चिंता वाढली. कारण बाळ जन्मल्यानंतर त्याची कोणतीही हालचाल होत नव्हती. डॉक्टरने तपासले असता, या बाळाच्या गळ्यात नाळेचा वेढा अडकल्याने बाळाचा श्वासोच्छ्वास काही काळ बंद झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर डॉ. पठाण यांनी गळ्याभोवतीचा नाळेचा वेडा काढत, कृत्रिम श्वासोच्छ्वास देत या बाळाचे प्राण वाचवले.

प्रसुती सुखरूप झाल्यानंतर बाळ आणि आई यांना सुरक्षितपणे निफाड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रसंगाने डॉक्टर कलीम पठाण, आरोग्य सेवक गोरक्षनाथ ताजणे, आशा कार्यकर्त्या सविता कोकाटे यांच्या कृतीतून माणुसकीचे दर्शन घडल्याने, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नवजात बालकाला नवीन ड्रेस घालत दिवाळी साजरी

डॉ. कलीम पठाण आणि त्यांचे सहकारी मित्र हे ब्राह्मणगाव येथील वस्तीवर असणाऱ्या मुलांना दिवाळी निमित्त नवीन कपडे, फराळ आणि फटाके घेवून गेले होते. अशातच या गोंडस बाळाचा जन्म झाल्याने, त्यांनी आणलेल्या नवीन कपड्यांपैकी एक ड्रेस लगेच या नवजात बाळाला घालत दिवाळी सण आनंदाने साजरा केला.

Back to top button