अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चोंडी गावात अवैध धंद्यांचा सुळसुळाट | पुढारी

अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चोंडी गावात अवैध धंद्यांचा सुळसुळाट

जामखेड; पुढारी ऑनलाईन: जामखेड तालुक्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चोंडी गावात मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे कडक कारवाई करून अवैध धंदे त्वरित बंद करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी जामखेड तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशनला शेकडो सह्यांचे निवेदन देऊन केली आहे.

निवेदनात असे म्हटले आहे की, आदर्श चोंडी गाव हे पर्यटन स्थळ असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ आहे. त्या अनुषंगाने गावात दररोज मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ असते. मात्र गावच्या प्रवेशद्वारावरच चिकनचे दुकान टाकले असून त्यामधूनच अवैध्य दारू विक्री केली जात आहे. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक आणि आश्रमशाळेपासून १०० मीटरच्या अंतरावर दारूचा अड्डा आहे. शाळेत येणाऱ्या लहान मुलांवर आणि पर्यटकांवर याचा वाईट परिणाम होत आहे.

स्थानिक दारू पिणाऱ्या व्यक्तींनी अनेकदा पर्यटकांशी हुज्जत घातलेली आहे. त्यांना सांगायला गेले दांडगाव्याची भाषा करतात. ग्रामपंचायतला सांगूनही काही निष्पन्न होत नसल्याने आम्ही आपणाला निवेदन देत आहोत. आपण यावर कार्यवाही करून संपुर्ण चोंडी गाव दारू मुक्त करावे आणि गावतील आई, बहीण यांचे संसार उध्वस्त होण्यापासून वाचवावेत यावर पूर्वक विचार करून गावातील नागरिकांना आणि भगिनींना न्याय द्याल अशी मागणी यावेळी दिलेल्या निवेदना मार्फत करण्यात आली आहे. यावेळी तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन येथे निवेदन देताना विजय भांडवलकर, शरद शिंदे, दादा सोनवणे, दीपक मोरे, विनोद साठे, काळू सोनवणे उपस्थित होते.

 

 

Back to top button