राज्यात केला जाणार 13.25 लाख मेट्रिक टन धान्यसाठा | पुढारी

राज्यात केला जाणार 13.25 लाख मेट्रिक टन धान्यसाठा

पुणे, पुढारी वृत्तसेवा: केंद्र सरकार आणि भारतीय खाद्य निगम महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायलो’ या अत्याधुनिक धान्य साठवण्याच्या पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. याअंतर्गत राज्यात 19 ठिकाणी 13.25 लाख मेट्रिक टन धान्यसाठा निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती निगमचे राज्याचे वरिष्ठ अधिकारी महाव्यवस्थापक मनमोहनसिंग सारंग आणि पुणे विभागीय व्यवस्थापक मनीषा मीना यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्रातील आठ विभागीय कार्यालयांतर्गत 91 गोदाम स्थित असून, त्याची धान्य साठवणूक क्षमता 19.75 लाख मेट्रिक टन इतकी आहे. ज्यामध्ये वैज्ञानिक पद्धतीने धान्याची साठवणूक केली जाते. भारतीय खाद्य निगमने नेहमीच काळाची गरज ओळखून वेळोवेळी आपल्या कार्यप्रणालीमध्ये सुधारणा करीत आधुनिकीकरणावर भर दिला आहे. राज्यात 8 विभागीय कार्यालये बोरिवली, पनवेल, पुणे, औरंगाबाद, मनमाड, अमरावती, नागपूर व गोवा येथे असून, राज्य सरकारच्या समन्वयाने सार्वजनिक अन्नधान्य वितरण प्रणालीमध्ये सुसूत्रता आणून प्रत्येक गरजूला योग्य वेळी पोषक अन्नधान्य पोहचविले जात असल्याचे सारंग यांनी सांगितले.

छतावर असणार सोलर पॅनेल

भारतीय निगमने अत्याधुनिकतेचा नेहमीच वापर केला असून, ज्याअंतर्गत गोदामाच्या छतावर सोलर पॅनल बसवून आधुनिकतेचा प्रत्यय दिला आहे. या माध्यमातून वार्षिक 60 लाखांपर्यंत बचत करण्याचे ध्येय आहे. परंपरेला आधुनिकतेची जोड देत महाराष्ट्रामधील सोलापूर, औरंगाबाद व धामणगाव येथे यांत्रिकीकरण करून धान्याची हाताळणी करण्यात येत आहे.

Back to top button